सहा महिन्यांच्या आतच उड्डाणपुलाचा जोड उखडला

नागपूर : ८ जून – काही महिन्यांपूर्वीच शुभारंभ झालेला मनीषनगरकडे जाणारा उड्डाणपुल आणि वर्धा मार्गावरील दुमजली मुख्य उड्डाणपुल यांचे जोडवळण उज्ज्वलनगर भागात आहे, नेमके याच ठिकाणी अंडरपासच्या प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूस असलेला जोड उखडला असल्याचे दिसत आहे, या संपूर्ण बांधकामाला मोठी भेग पडली असल्याने परिसरातील नागरिक आणि वर्धामार्गावरुन तसेच उड्डाणपुलावरुन जाणार्या वाहनचालकांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.
अजनी चौक ते विमानतळ या मार्गावर दुमजली उड्डाणपुल आणि त्यावर मेट्रो असा त्रिस्तरीय संगम असलेला अभुतपूर्व उड्डाणपुल नागपुरात साकारण्यात आला त्यानंतर मनीषनगर अंडरपास आणि त्यावरील उड्डाणपुल तयार झाला आणि जोडण्यात आला व वर्धा रोडच्या उड्डाणपुलावरुन डावे वळण घेऊन मनीषनगर कडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी सर्व संबंधित बांधकाम कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाचे विशेष कौतुक झाले आणि खरोखरच हा अभियांत्रिकी कौशल्याचा अनुपम नमुना आहे. काही महिन्यानंतर आता परिसरातील नागरिकांना आज दुपारी पुलाच्या जोडाला भेग पडली असल्याचे दिसून आले. या प्रकाराची परिसरात चर्चा झाली आणि काही उत्साही नागरिकांनी याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले.
यासंदर्भात मेट्राचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेची माहिती मिळाली, पाहणी देखील केली पण तो सिमेंटचा तुकडा खाली पडणार नाही, पुलाचा जोड देखील उखडला नाही. यामुळे नागरिकांना धोका नाही तसेच काम देखील सुरक्षित आहे, लवकरच त्यावर उपाय करण्यात येईल आणि प्रसंगी कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले.

Leave a Reply