मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार

मुंबई : ७ जून – कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारनेच याबद्दल कायदा करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर, महाराष्ट्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी मदत मागितली होती. पण अजूनही केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हक्काचे असलेली जीएसटीचा परतावा सुद्धा केंद्र सरकारने दिलेला नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी याबद्दल मागणी केली होती. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्राने कायदा करून दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नवी दिल्लीत ही पहिलीच भेट असणार आहे. दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.

Leave a Reply