चंद्रपूर जिल्ह्यातील दारू परवाने मराठी तरुणांना द्या – मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

चंद्रपूर : ७ जून – चंद्रपूर येथील मराठी बेरोजगार संघटनेने एक अजब मागणी केली आहे. जिल्ह्यात दारू पुन्हा सुरू होत असल्याने हे परवाने मराठी मुलांना देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. दारूचे परवाने या आधी जिल्ह्यातील परप्रांतीय दुकानदारांकडे असल्याने ते श्रीमंत झाल्याचा दावा निवेदनात केला गेलाय. आता मराठी मुलांना पायावर उभे करण्यासाठी सर्व जुने परवाने रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मराठी युवकांना यासाठी मुद्रा योजनेतून कर्ज देण्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटली, ही या जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेकरीता चांगले पाऊल समजले तरी याचा खूप मोठा फायदा हा स्थानिक मराठी माणसांना होईल, असे समजणे बरोबर होणार नाही. जिल्ह्यात दारुबंदी जरी उठली असली तरी मोठा फायदा हा अमराठी भाषिकांनाच होणार आहे. कारण जिल्ह्यात 80 टक्के मद्यव्यवसाय हे बाहेर राज्यातून येथे स्थायिक झालेल्या परप्रांतीय लोकांचेच आहेत. फक्त त्या दारू दुकानात नोकर इत्यादी कामांसाठी मराठी माणसं राहतात. दारू दुकानाबाहेर छोटे-मोठे व्यवसाय मराठी माणसांचे असतील, अवैध दारुविक्री संपेल व जिल्ह्यातील ईकॉनॉमीमधे रेलचेल असेल. फक्त तेवढाच या जिल्ह्यात दारूबंदी हटण्याचा फायदा होईल, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दारू विकून आबाद होणारे राज्याबाहेरून आलेले अधिक आर्थिक गब्बर होतील, जे नंतर आपल्याच विचारहीन व दूरदृष्टीहीन राज्यकर्त्यांना पैसा पुरवून येथे दादागिरी करतील. तर दारू पिऊन बरबाद होणारे आपली मराठी माणसं अधिक असतील. बरबाद जरी नाही झाले तरी वेळ, पैसा, शांतता नक्कीच खर्ची घालतील. जुन्या सर्व दारू व्यावसायिकांचे परवाने रद्द करून नव्याने दारू व्यवसायाचे परवाने देण्यास अर्ज मागवावे आणि शिक्षित बेरोजगार, गरजू, होतकरू स्थानिक मराठी तरुणांना फ्रेश परवाने दयावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यासाठी सदर व्यवसायाला लागणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीकरीता मुद्रा योजनेतून बँकांमार्फत कर्ज मिळवून देण्यास सहकार्य करावे. तुम्ही शिक्षणाची अट ठेवू शकता. आम्ही सदर व्यवसाय करण्याकरीता अर्ज करण्यास इच्छुक आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे म्हणून आपण स्थानिक मराठी तरुणांकरीता याबाबतीत सहानुभुतीपूर्वक विचार कराल, ही अपेक्षा असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply