शेवटची विनवणी…..

(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक कै. माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचा हा लेख.)
शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची !
जगद्गुरु तुकोबारायांच्या याच ओळींचा आठव श्री गुरुजींना का झाला असेल ?
तुकोबाराया म्हणजे कारुण्याचा पुतळा. अपार भक्तीचा साक्षात दाखला. मेणाहून मऊ विष्णुदास पण वज्राहून कठोर केव्हा व्हायचे याचे गमक साधलेले संत म्हणजे तुकोबाराया. भागवत धर्माचा ज्ञानदेवांनी पाया रचला आणि तुकोबा कळस झाले. आध्यात्मिक उन्नतीचा कळस आहे हा.
श्री गुरुजींना आपल्या शेवटच्या काळात तुकोबांच्या याच शेवटच्या विनवणीचे स्मरण झाले. ही शेवटची म्हणजे यापूर्वीही सातत्याने विनवणी होतीच. तुकोबारायांच्या काही विनवण्या प्रसिद्ध आहे. त्यांनी त्या थेट परमेश्वराकडे किंवा जनता जनार्दनाकडे मागितल्या आहेत.
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ।।
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ।।
संतांचा संग त्यांनी सदैव मागितला. जन्मोजन्मीच्या मुक्तीच्या फेऱ्याचे तुकोबांना आकर्षण नाही. मोक्षाचाही मोह नाही तर मग धन, वैभव, संपत्ती, सत्ता यांचा प्रश्नच नाही. तुकोबांची साधना मुक्तीसाठी नाही. जन्मोजन्मीचा फेरा चुकवण्याची तुकोबांची तयारी नाही. न लगे मुक्ती, याचाच अर्थ पुन्हा जन्म घेण्याची तुकोबांची तयारी आहे. त्यासाठी गर्भधारणेत आकार घेण्याची त्यांची आनंदाने तयारी आहे. कशासाठी तर सदा सर्वदा संत संग घडायला हवा. गर्भवासी असणे ही कोंडून घेतलेली बंदिस्त स्थिती आहे. मातेसाठी ती वेदनादायी असली तरी सुखद आहे. विज्ञानाच्या पातळीवर ही स्थिती वेगळी असली तरी कोण्याही जीवाला या स्थितीचा अनुभव सांगता येत नाही. बीज अंकुरल्यापासून तर फळ आकाराला येण्यापर्यंतचा गर्भातील खडतर काळ सुखाने परत परत उपभोगण्याची तुकोबांची तयारी आहे. तुझ्या चरणांचा विसर न होणे हा तर त्यांचा जणूकाही जन्महेतूच आहे.
हा सर्व खटाटोप कशासाठी तर तुझे गुण आवडीने गाण्यासाठी. त्या सर्व शक्तीमानाचा विसर न पडावा म्हणून. अत्यंत सोप्या पण रसाळ भाषेत तुकोबा आपली विनवणी करतात. यात भक्तीचे अत्त्युच्च लाघव आहे. त्यांचे जीवनध्येय त्यांच्या या पसायदानात दिसते.
आपल्या शेवटच्या विनवणीत ही तुकोबाराया ठाम आहेत. तुकोबारायांच्या पसायदानात ते संतसंग मांडतात. व शेवटची विनवणी करताना त्यांना संतजनांचा विसर पडत नाही.
शेवटची विनवणी, संतजनी परिसावी… तुकोबारायांची संतांची व्याख्या अद्भुत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा… समाजातील पिडितांची, शोषितांची तुकोबांना अपार कणव आहे. नुसता कळवळा व्यक्त करून ते थांबत नाहीत. समाजाच्या प्रबोधनासोबतच त्यांची प्रत्येक कृती आदर्श प्रस्थापित करणारी असते. त्यासाठी आवश्यक ते मोल चुकवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी असते. पण त्या सामर्थ्याचा अहंकार न बाळगता त्याचे श्रेय पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्याची वृत्ती. ही वृत्ती म्हणजे ईदं न मम् चा भाव !
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित.. जे काही केले त्याचे श्रेय नको. इथे ‘मी’ नाहीच. कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो! केलेल्या कृतींचा पाढा त्यांना वाचायचा नाही. ज्याच्या प्रेरणेने हे घडले, त्याच्याच पायाशी ते जीवन समर्पित आहे.
तुकोबांनी मोक्ष प्राप्तीसाठी किंवा जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी संसार सोडला नाही. व्यक्तिगत मोक्षाच्या मागे न लागलेला हा संत. अवघाची संसार सुखाचा करिन, म्हणजे काय ? स्वतःच्या उद्धाराची ओढ नाही. मोह नाही. ज्या समाजात जगलो, वाढलो, त्या समाजाच्या उत्थानाचा विचार आयुष्यभर अंगी बाणला आहे.
श्री गुरुजींच्या जीवनात सर्वत्र ईदं न मम् चा भाव दिसतो. आध्यात्मिक जीवनात रमलेल्या गुरुजींना डॉक्टरांनी संघाच्या कार्यात आणले. नरेन्द्राने कालिमातेला मुक्ती दे, वैराग्य दे, असा आशीर्वाद मागितला तर रामकृष्णांनी त्याला ‘स्वार्थी’ म्हणून खडसावले. मुक्ती, वैराग्य मागून स्वार्थी बनतोस काय ? रामकृष्णांनी त्या नरेन्द्राला समाजाच्या स्वाधीन केले. त्या नरेंद्रचा विवेकानंद झाला. साधनेसाठी हिमालयाची ओढ असलेल्या गुरुजींना डॉक्टरांनी ओढून आणले. त्यानंतर गुरुजींचे एकमेव ध्येय होते भारतमाता. जे केले ते ते अंत:प्रेरणा देणाऱ्या त्याच चरणांवर समर्पित करण्याचा भाव गुरुजींच्या अंगी आहे. त्यांनाही व्यक्तिगत पातळीवर व्यक्त व्हायचे नाही. हे जीवन मातृचरणी समर्पित आहे. शेवटच्या विनवणीतील भाव हेच गुरुजींचे समग्र जीवन आहे. त्यांचा जन्महेतू तसाच व्यक्तिनिरपेक्ष आहे. ठायी विश्वाचे आर्त सामावले आहे.
गुरुजींच्या स्मृतिदिनी या विनवणीचा अर्थ मला असा गवसतो.

शिवराय कुळकर्णी

Leave a Reply