वेतन थकबाकी मिळावी यासाठी रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्यपालांना दिले

चंद्रपूर : ३ जून – चंद्रपूरमध्ये सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ११५ दिवसांपासून चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या कोरोना योध्या कामगारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे.
मागील ११ महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १२ महिन्यापासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नाही. कत्राटदार नसतांना कंत्राटी कामगारांकडून कोरोना आपत्तीमध्ये कामे करवून घेण्यात आली. मात्र कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांचे 7 महिन्यांचे पगार थकीत आहेत.
शासनाची पूर्वपरवानगी घेऊन 562 कंत्राटी पदासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या १२ महिन्यानंतर नवीन कंत्राटदाराला कामाचा आदेश देताना निविदेतील ३५५ कंत्राटी पदे कोणतेही ठोस कारण नसताना कमी करण्यात आली. ५६२ पदासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फक्त २०७ पदासाठी कंत्राटदाराला काम देण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कामगारांवर उपासमारी सोबतच बेरोजगारीची सुद्धा आपत्ती आलेली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहचविण्यासाठी भ्रष्टाचार केला.त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कंत्राटादाराची नेमणूक करण्यास विलंब झाला, असा कामगारांचा आरोप आहे. 7 महिन्यांचा थकीत पगार, किमान वेतन व हक्काचा रोजगार या मागण्यांसाठी डेरा आंदोलनातील शेकडो कामगारांच्या रक्ताने पत्र लिहून व सह्या करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविण्यात आले.
कामगारांच्या जीवाची हानी झाल्यास वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री तसेच भ्रष्ट अधिकारी यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे तसेच ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी या पत्रातून केलेली आहे. थकीत पगारासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांचा सुड उगविण्यासाठी त्यांचा रोजगार हिसकावून घेण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख थकीत पगाराच्या कायदेशीर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जगायचे कसे ? आम्ही आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल ही कामगारांनी केला आहे,

Leave a Reply