भंडारा जिल्ह्यात आधी अस्वलाचा उच्छाद, आता होतोय बिबट्याचा धुमाकूळ

भंडारा : ३ जून – अड्याळ परिसरात काही दिवसांपुर्वी अस्वलाने उच्छाद मांडल्यानंतर आता बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. अड्याळजवळील ओसाड असलेल्या चकारा वसाहतीत मादी बिबट्याचे पिलू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने तात्काळ धाव घेत मादी बिबट्याच्या शोधासाठी कॅमेरा ट्रॅप लावला आहे.
अड्याळ वनपरिक्षेत्र अंतर्गत येर्णा‍या चकारा येथील जुन्या सिंचन कॉलनीमधील एका पडक्या क्वार्टर मध्ये एक बिबट्याचे पंधरा दिवसाचे पिलू दिसून आले. परिसरातील जनतेनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सदर परीसरात आठ दिवसापूर्वी अस्वलाने दर्शन दिले होते. परिसरात चार ते पाच अस्वलाचे वास्तव्य असल्याने अनेकांना जखमी केले आहे तर चकारा येथे कॉलनीत बिबटचे पिलू आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळाला सहाय्यक वनसंरक्षक वाय. बि. नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक अड्याळ वनरक्षक विनोद पंचभाई, निंबार्ते, हटवार कानस्कर, कवाळे व वनमजूर परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवून आहेत. सध्या पिलू एकटेच असल्याने त्याठिकाणी मादी बिबट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.

Leave a Reply