बिबट्याची वनविभागाला पुन्हा हुलकावणी

नागपूर : २ जून – गायत्रीनगरातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे मोर्चा वळवलेल्या बिबटय़ाचे वनखात्याला हुलकावणी देणे सुरूच आहे. हा बिबट अस्तित्वाच्या खाणाखुणा सोडत आहे, पण त्याचा मागोवा घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तो अजूनही सापडलेला नाही. दरम्यान, मंगळवारी प्राणिसंग्रहालय परिसरात एक डुक्कर मृतावस्थेत आढळले. मात्र, त्याची शिकार बिबटय़ानेच केली का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास महाराजबागेत काम करणाऱ्या महिलेला हा बिबट नाल्यावरील पुलाच्या कठडय़ाच्या भिंतीवर दिसला. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला कळवल्यानंतर वनखात्याचा ताफा पोहोचला. बिबटय़ाला कैद करण्यासाठी दोन पिंजरे आणि सात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. रात्रभर याठिकाणी बिबटय़ाचा शोध घेण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. मंगळवारी सकाळी वनखात्याची चमू परिसरात तपासमोहीम राबवत असताना याठिकाणी डुकराची शिकार केलेली दिसून आली. तात्काळ खात्याचे श्वानपथक बोलावण्यात आले. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. नागरिकांनी के लेल्या गर्दीमुळे तपासकार्यातही अडथळे येत होते. गायत्रीनगर ते व्हीएनआयटी आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे आहेत. तसेच मुख्य नाल्यांना जोडलेला हा परिसर आहे. खाद्य, पाणी व निवारा मिळाल्याने त्याचा प्रवास सुकर होत आहे. बिबटय़ाच्या शोधासाठी सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र कार्यालय, हिंगणा वनपरिक्षेत्र कार्यालय व ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पथक रात्रंदिवस तैनात आहे. नागरिकांनी या परिसरात अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी के ले आहे.

Leave a Reply