आज भर दुपारी बिबट्या महाराजबागेत दिसला

नागपूर : १ जून – शहरात मागील तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने दहशत निर्माण झाली आहे. यात वनविभाग त्याच्या मागावर असताना बिबट्या त्यांना हुलकावणी देत आहे. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास महाराज बाग प्राणी संग्रहालयात महिला काम करत असताना हा बिबट बागेच्या मागील बाजूस वाहणाऱ्या नाल्याच्या भिंतीवर दिसून आला. यामुळे पुन्हा खळबळ उडाली असून शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
वन विभागाने या नाल्याच्या आतील भागात जाण्यास मनाई केली आहे. तर बिबट्याने महाराज बाग परिसरात डुकराची शिकार केली असून त्याने काही भाग खाल्ला आहे. या परिसरात वन विभागाने आता ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम सुरू केले आहे. तर चार पिंजरे लावण्यात आले आहेत. अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
हा बिबट्या आता वर्दळीच्या ठिकाण शहराचे हृदयस्थान असलेल्या बर्डी भागात पोहचल्याने भीती निर्माण झाली आहे. यामुळे वन विभागाने हा परिसर पिंजून काढला आहे. महाराज बाग परिसरात शहरातून वाहणारा नाला परिसर झुडपांचा असल्याने तो दिसण्यास अडचण निर्माण झाली आहे. पण ता मात्र भीती वाढली असल्याने वन विभागाने कसून शोधमोहीम सुरू केली असून या भागात आता पिंजरा लावून पकडण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
नागपूर शहरातील आयटी पार्क परिसरात गायत्री नगरात हा बिबट पहिल्यांदा शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास नरेंद्र चाकोले यांना दिसला होता. त्यानंतर वन विभागकडून त्या परिसरात शोध मोहीम दिवसभर राबवण्यात आली. पण बिबट्या दिसून आला नाही. पण शनिवारी पाहाटे मध्यरात्री अडीचच्या सुमारास ट्रस्ट नामक कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना दिसला. यावेळी तो सीसीटीव्ही दिसल्याने त्याचा वावर असण्याला शिक्कामोर्तब झाला. पण त्यानंतर जवळपास 21 ट्रॅप कॅमेरे लावून शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पण अद्यापही तो ट्रॅप कॅमेरात आला नाही.
रविवारी मध्यरात्री ते सोमवारच्या पहाटे पुन्हा तो बजाज नगर भागात दिसून आल्याचे बोलले जात होते. पण तेव्हाही तो ट्रॅप कॅमेरात दिसून आला नाही. यात सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तो महाराज बाग प्राणी संग्रहालयाच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या भिंतीवर दिसल्याने पुन्हा खळबळ निर्माण झाली.
आताच्या घडीला जिथे बिबट्या दिसून आला त्या ठिकाणावरून बिबट्या हा अवघ्या 500 मीटर दूर आहे. त्यामुळे एवढ्या वर्दळीच्या भागापर्यंत बिबट कसा काय पोहोचला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. वन्य प्राणी तज्ञांच्या मते गेल्या तीन दिवसांमध्ये हा बिबट्या डिस्टर्ब झाला आहे. तो वाहनांच्या आणि माणसांच्या आवाजामुळे घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो नाल्याच्या काठाने पुढे पुढे सरकत आहे. वन्यप्राणी तज्ञांच्या मते जर त्याला संधी मिळाली तर तो पुन्हा अंबाझरी बायोडायव्हर्सिटीत निघून जाईल.
हा बिबट अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्क जो जवळपास 700 एकराच्या परिसर आहे. त्या भागातून हा बिबट्या आला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. बायरोड हे अंतर 6.2 किलोमीटर आहे. तेच गायत्री नगर पासून हे महाराज बाग हे अंतर बायरोड 5.5 किलोमीटर आहे. यात हा बिबट्या नाल्याच्या काठाने आला असला तरी बरेच लांब अंतर पार करून आला आहे. या दरम्यान शहरातील वस्तीच्या भाग लागून असलेल्या परिसरातून तो चक्क नागपूर शहराच्या मध्यभागात वर्दळीच्या ठिकाणी पोहचला आहे. यामुळे आता त्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. यात वन विभागाच्या कितपत यश मिळते हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply