पंजाबमध्ये काँग्रेसच्या २५ आमदारांचे बंड

चंदीगड : ३१ मे – कोरोना संकट सुरू असतानाच पंजाबमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसच्या २५ आमदारांनी बंड पुकारलं असून मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत पाचारण केलं आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावल्यानंतर ते दिल्लीत पोहोचले आहेत. या सर्व आमदारांशी काँग्रेसचं एक तीन सदस्यांच्या पॅनल चर्चा करणार आहे. त्यांच्यासमोर हे आमदार आणि मंत्री त्यांच्या समस्या मांडणार आहेत.
भाजपचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. हे सर्व लोक दिल्लीला पोहोचले आहेत. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
या सर्व आमदार आणि मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी हायकमांडने तीन सदस्याचं पॅनल तयार केलं आहे. काँग्रेस नेते हरिश रावत यांच्या नेतृत्वात हे पॅनल तयार करण्यात आलं आहे. त्यात मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा समावेश आहे. हे पॅनल एकाएका आमदार आणि मंत्र्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकणार आहेत. त्यानंतर हा अहवाल हायकमांडला देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
आज चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आज पॅनेलशी चर्चा करणार आहे. तर उद्या मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू, परगट सिंह हे पॅनेलशी चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे अमरिंदर सिंग यांच्या अत्यंत निकटचे मानले जाणारे मनप्रीत बादल आणि साधू सिंगही दिल्लीत आले असून तेही पॅनलशी चर्चा करणार आहेत. तर, स्वत: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे शुक्रवारी या पॅनलशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply