अजित पवारांनी रामदास आठवलेंकडे केली केंद्र सरकारची तक्रार

मुंबई : ३१ मे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी रामदास आठवले यांना तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. तुम्ही महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आता दिल्लीत जाऊन तुम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटा आणि तौक्ते चक्रीवादळासाठी योग्य ती मदत महाराष्ट्राला द्या, असे सांगा. गुजरातने काहीच मागणी केली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्यकर्ते हे येत आणि जात असतात. जनता त्यांना निवडून देत असते. मात्र, आजपर्यंत केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी राज्यांना मदत देताना इतका भेदभाव झाला नव्हता किंवा तसे जाणवलेही नसेल. यामध्ये कितपत तथ्य आहे हे माहिती नाही पण याचा गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी तौक्ते चक्रीवादळानंतर प्रथम महाराष्ट्रात येणार होते. मात्र, नंतर त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला आणि ते गुजरातमध्ये गेले. त्याठिकाणी जाताच मोदींनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
कार्यक्रमात अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर इंधन दरवाढीचा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामध्ये आता केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. काहीजण राज्य सरकारने कर कमी करावा, असा सल्ला देतात.
मात्र, पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक कर हा केंद्र सरकारकडून लावला जातो. राज्यांकडून लावण्यात येणाऱ्या कराचे प्रमाण तितकेसे नसते. त्यामुळे आता केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा आणि अन्यथा करातून जमा होणाऱ्या उत्पन्नातील वाटा राज्यांना द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

Leave a Reply