संपादकीय संवाद – मोदी सरकारची ७ वर्षे

आज ३० मे रोजी मोदी सरकार दुसऱ्या खेपेत सत्तेत आल्याला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत. २०१४च्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशात प्रथमच भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पूर्ण बहुमत मिळून सत्तेत आला होता ही बाब लक्षात घेता मोदी सरकारच्या राजवटीला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
मोदी सरकार देशात सत्तेत आल्यापासून या सरकारने देशाचे नुकसानच केले आहे, असा आरोप देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस वारंवार करत आहे. मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ६ महिने आधीपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चौकीदार चोर है चा नारा देत देशभर फिरले तरीही मोदी सरकारला ते घरचा रास्ता दाखवू शकले नाहीत. किंबहुना भरभरून माप मोदींच्या पदरात टाकले. २०१४ मध्ये भाजपला लोकसभेत २८२ जागा मिळाल्या होत्या २०१९ मध्ये या जागा वाढून ३०३ झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेता विरोधकांचा घणाघाती प्रचार देशातील जनतेला मान्य नव्हता हे स्पष्ट झाले आहे.
या सात वर्षात मोदी सरकारला अडथळ्याची शर्यत धावतच अनेक निर्णय घ्यावे लागले सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभेत पूर्ण बहुमत असले तरी राज्यसभेत मात्र विरोधकांचा जोर होता त्यामुळे पहिल्या पाच वर्षात मोदींना कोणताही धडक निर्णय घेताना विरोधकांशी कुठेतरी जुळवून घेत पुढे जावे लागत होते. २०१९ नंतर परिस्थिती थोडी निवळली होती. तरीही या काळात त्यांनी तिहेरी तलाक रद्द करणे, काश्मीरची स्वायत्तता काढून घेणे, सीएए आणि एनआरसी, कृषी कायदे, जीएसटी असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. भारतावर सतत कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचे नाकही ठेचले, चीनलाही जरब बसवली. आंतरराष्ट्रीय जगतात भारताची प्रतिमा कशी उंचावेल यासाठी प्रयत्न केला.
असे असले तरी काही मुद्द्यांवर मोदी सरकार आजही अपुरे पडते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. पेट्रोल ७० रुपयांवरून १०० रुपयांवर गेले आहे इतरही क्षेत्रात महागाई प्रचंड वाढते आहे. कोरोना प्रकरणात सरकारी यंत्रणांची प्रचंड ससेहोलपट होते आहे. त्यामुळे जनमत काहीसे नाराज आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
मात्र वाढत्या महागाईला आणि इतर अनेक समस्यांना एकट्या मोदी सरकारलाच जबाबदार धरता येणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांपैकी जवळजवळ ५७ वर्षे काँग्रेसचेच सरकार होते. उरलेल्या १६ वर्षांपैकी सहा वर्ष हे आघाड्यांचे सरकार होते. काँग्रेस आज सत्तर रुपयांवरून १०० रुपयावर पेट्रोलचे भाव गेले म्हणून मोदींवर टीका करते मात्र १९७० साली जेमतेम ४५ नवे पैसे लिटर इतके भाव असलेले पेट्रोल २०१४ पर्यंत ७० रुपये लिटरवर कसे गेले याचे उत्तरही काँग्रेसने आधी द्यायला हवे. एकूणच जवळजवळ ६० वर्ष काँग्रेसने या देशाची व्यवस्था पुरती रसातळाला नेली होती. ती सात वर्षात पूर्णतः मार्गावर आणणे कठीण आहे तरीही मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले आहेत. हे नाकारता येणार नाही.
असे असले तरी मोदींना देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांना कठोर आत्मपरीक्षणाची आणि देशातील सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे. ते होते आहे मात्र अधिक जोमाने व्हायला हवे त्यासाठी पंचनामा परिवाराच्या मोदी सरकारला खूप खूप शुभेच्छा……

अविनाश पाठक

Leave a Reply