जालन्यात भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २९ मे – जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण रंगलेय. शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केलीय.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलंय. पत्रातून ते म्हणतात, जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना 9 एप्रिल 2021 रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानुष, रानटी मारहाणीचा व्हिडीओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तीजनक शब्दांत कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा. पण त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हिडीओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलीस त्यांना घेरून अमानुष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली, असंही देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नमूद केलंय.
रुग्णालयात धुडगूस घालणार्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून संतापाच्या भरात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच कायदा हाती घेतलेला दिसून येतो. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
जर नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण सराईत गुन्हेगारालासुद्धा मारहाण करण्यात येत नाही, अशा पद्धतीने नारियलवाले यांना मारहाण करण्यात आली. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिवीगाळीचा व्हिडीओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अॅट्रॉसिटीच्या एका प्रकरणात लाच घेताना सापडून निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता, असंही ते म्हणतात

Leave a Reply