आ. लंके यांचे काम देशासाठी दिशादर्शक – अण्णा हजारे

अहमदनगर : २९ मे – मानवसेवा हीच माधवसेवा आहे, या भावनेतून करोना संकटकाळात आमदार नीलेश लंके करीत असलेले काम केवळ तालुका, जिल्हा, राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आदर्शवत, दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. तळागाळातील दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आमदार लंके यांना दीर्घायुष्य लाभावे अशा भावनिक शुभेच्छा हजारे यांनी दिल्या.
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी राळेगण सिद्धी येथून भ्रमणध्वनीद्वारे भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. हजारे म्हणाले की, देशात अनेक आमदार आहेत मात्र आमदार लंके यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी २४ तास वाहून घेणारा लोकप्रतिधी विरळाच. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आमदार लंके यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झालेला रुग्ण तेथील आनंदी वातावरणाचा अनुभव घेतल्यावर आपण आजारी आहोत, आपणास कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे विसरून जातो. नीलेश लंके ज्या वेळी आमदार नव्हते, त्या वेळीही जनसामान्यांसाठी ते अहोरात्र झटत असत हे आपण अनुभवले आहे. आमदार लंके कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता करीत असलेल्या निष्काम सेवेमुळे त्यांच्या विषयीचा आदर वाढत आहे, असे हजारे म्हणाले.
आमदार नीलेश लंके यांनी अहोरात्र जनसेवेसाठी वाहून घेतले आहे. मात्र ते स्वत:ची काळजी घेत नाहीत. शरीर हेच जनसेवेचे साधन आहे. त्यामुळे आमदार लंके यांनी जपले पाहिजे. त्यांना उत्तम दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.

Leave a Reply