भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा खोटा – राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : २८ मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी जबाबदार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. कोरोनामुळं भारतात झालेल्या मृत्यूचा समोर आलेला आकडा हा खोटा असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात केंद्रानं सर्वकाही खरं सांगायलाच हवं असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच कोविड १९ च्या संकटाचा समजण्यातच पंतप्रधान मोदी अपयशी ठरल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधताना मोदींवर टीका केली आहे. त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका केली. आम्ही केंद्र सरकारला कोविड 19 च्या संकटाबाबत वारंवार इशारा गेत होते. पण पंतप्रधान मोदींनी कोरोनावर विजय मिळवल्याचंही जाहीर केलं. पण हा एक पसरत जाणार किंवा सतत बदलत राहणारा आजार आहे. त्यामुळं लॉकडाऊन किंवा मास्क परिधान करणं हा तात्पुरता उपाय असून लसीकरण हाच यावर कायमस्वरुपी तोडगा ठरू शकतो असं राहुल गांधी म्हणाले. केंद्र सरकारला त्यांचा सामना कशाशी आहे हेच समजत नसल्याचंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलं.
या विषाणूच्या विकासाचा धोका लक्षात घेणं गरजदेचं आहे. आपण संपूर्ण जगासाठी किंवा पृथ्वीसाठी धोका निर्माण करत आहोत. कारण आपल्या लोकसंख्येच्या 97 टक्के नागरिकांवर हल्ला करण्याची संधी विषाणूला आहे. त्याचं कारण म्हणजे केवळ 3 टक्के नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण झालं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनाही सुनावले. जर तुम्ही कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं असं राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नियोजनाचा विचारच करत नाहीत. त्यामुळं लसीकरणासाठीही कोणतेही नियोजन केलं नाही, असा आरोपही राहुल गांधींनी लावला आहे. ते इव्हेंट मॅनेजर आहेत आणि एका वेळी ते एकाच इव्हेंटचा विचार करतात, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. अच्छे दिनच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधींनी केंद्राला चिमटा काढला. तसंच सकारात्मकता किंला पॉझिटिव्हिटी हा केवळ पीआर स्टंट असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधीनी आधी केलेल्या कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याच्या आरोपाचाही यावेळी पुनरुच्चार केला.

Leave a Reply