संवेदनशील आणि द्रष्टा लोकनेता नितीन जयराम गडकरी

आपल्या देशात आपण विभूतिपूजनाची परंपरा फार पूर्वीपासून अत्यंत निष्ठेने चालवीत आलो आहे. पण त्या महान विभूतिपर व्यक्तिमत्वांनी सांगितलेली महान मूल्ये-तत्वे यांचा आपल्या आचरणात मात्र वापर सहसा करीत नाही. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की बोले तैसा चाले – त्याची वंदावी पाऊले ह्या संतोक्तीला आजघडीस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून विविध राजकीय नेत्यांचा तद्वतच काही सामाजिक आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा समावेश होतो. याच दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांच्या मांदियाळीत विदर्भातले विशेषतः आपल्या नागपूरचे कर्तबगार सुपुत्र नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेलच. ही बाब प्रशंसकांसह विरोधकही सहजगत्या मान्य करतील.
लोकनेता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ नितीनजी घालून देत आहेत. ह्या बाबत अनेक लोकप्रतिनिधींनीदेखील दिलखुलास पावती दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका हा पार क्षितिजरेषेपर्यंतचा असून कामाचा झपाटापण वादळवेगाचा आहे. मात्र या वादळवेगाने कुणाचे नुकसान तर झालेच नाही उलट अनेकांना या वादळवाऱ्यामुळे समाधानाची शीतल झुळूक अनुभवायला मिळाली आहे. त्यांचे काम मुळातच जनकल्याण , बहुजन हिताय बहुजन सुखाय या मूळ तत्वावर आधारित असते.
जनकल्याणाचा वसा आणि वारसा त्यांच्या पितृ संघटनेने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. आणि तो मी जोपासत राहीन, अशी निर्मळ आणि रोखठोक ग्वाही नितीनजींनी सार्वजनिक समारंभातून अनेकदा दिली आहे. ही त्यांच्या तत्वाची विचारांची पारदर्शकता स्वकीयांसोबत विरोधकांनाही मैत्रीच्या मोहात पाडते.
भाजप नेते प्रमोद महाजनांनंतर समाजाच्या सर्व घटकांसमवेत जिव्हाळ्याचे संबंध नितीनजींनी जोपासले-बळकट केले आहे. ते त्यांच्या अकृत्रिम आणि मदतीस तयार असलेल्या स्वभाव वृत्तीमुळे. त्यांच्यात एकच दोष म्हणजे त्यांना नाही म्हणणे जमत नाही हाच होय.
गेल्या फेब्रुवारी-मार्च-एप्रिल महिन्यात राज्यात आणि देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात कोरोना बाधितांच्या आणि मृत्यूच्या संख्येचा दरदिनी अक्षरशः स्फोट होत होता. अशावेळी शासनाकडून आवश्यक त्या मदतीचा ओघ सुरु नव्हता तर उपदेशाचे केवळ डोस मिळत होते. आणि अन्य संबंधितांवर नियमाने दोषारोपण होत होते. राज्यातील जनता असहायपणे ते पाहत होती. अशावेळी ह्या लोकनेत्याने राजकारण बाजूला ठेऊन केवळ समाजकारणाचे असिधारा व्रत अंगिकारले व तेही आपण स्वतःहून स्वतःच्या मंत्रालयाची कामे करताकरता पुरेवाट होत असताना हा नागपूरपुत्र आणि कळवळ्याचे हृदय घेऊन असलेला नेता अक्षरशः ठाण मांडून ढिम्म प्रशासनाच्या बैलांना पुराण्या टोचून कामाला लावत होता स्वतःही झपाट्याने काम करीत होता. ह्या कालावधीत नितीन गडकरींनी वणी-कळंब-यवतमाळ-वर्धा-हिंगणघाट-अमरावती-नागपूर-भंडारा-गडचिरोली सारख्या ठिकाणी मागणीवरून आणि गरजेनुरूप व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन काँसंट्रेटर्स. ऑक्सिजन सिलिंडर्स, रेमेडिसिवीर इंजेक्शन्सचे व्हॉयल्स यांच्या पुरवठ्याचा पाऊस पाडला. ह्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता. ह्या वस्तूंची मागणी करणारे कोणत्या पक्षाचे आहेत, आपले आहेत की परके आहेत याचा एकदाही विचार केला नाही. स्थूलभयास्तव ह्या वस्तूंच्या तपशीलवार पुरवठ्याची यादी उपलब्ध आहे पण ती आकडेवारी देऊन मला त्यांचे मोठेपण येथे अधोरेखित करायचे नसून ते जगमित्र आणि अज्ञातशत्रू असल्यामुळे संकटाच्या काळात मदतीचा गोवर्धन सहज उचलले आहे.
अलीकडेच डॉ. दंदे फाउंडेशनच्या मदतीने गेल्या काही वर्षांपासून मृतप्राय ठरलेल्या जुन्या नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करून अद्ययावत असे ६० खाटांचे व १५ ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारले गेले. त्याच्या उदघाटन समयी नितीनजीनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या सहृदयाची साक्ष देणारे ठरतात. त्यावेळी ते म्हणाले होते की, संकटकाळात समाजहित जोपासणाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे. यासाठी शासनासोबत लोकप्रतिनिधी आणि समाजऋणाचे भान जपणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन या कोरोना संकटावर मात केली पाहिजे. एव्हढेच बोलून थांबतील ते गडकरी कसले? त्यांनी या रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका, १० व्हेन्टिलेटर्स आणि स्वतःचा असा अद्ययावत ऑक्सिजन प्लांट उभारायला म्हणून एक कोटी रुपयाची मदत जाहीर केली.
नितीनजींच्या ह्या कामाचा झपाटा पाहून, ऐकून, वाचून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यग्रस्त खासदार वय ८१ वर्षे सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र शासनाला दिलेला सल्ला सोशल मीडियावर आणि मुद्रित माध्यमांवरही फारच गाजला. स्वामी आपल्या विधानात म्हणतात, कोरोनाविरुद्धच्या मोहिमेचा सारा कारभार नितीन गडकरी यांच्याकडे द्यावा. कोरोना विरुद्धच्या लढाईची सूत्रे गडकरींकडे सोपवा. केवळ राज्यस्तरावरच नव्हे तर देशस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेतेही नितीन गडकरींवर एव्हढा विश्वास दाखवतात यातच त्यांच्या कार्याचे यश आहे. यात विरोधकही आहेत राजकारण मात्र कुठेही नाही. मात्र नितीनजी नम्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत आणि राहू असा विश्वास जनतेला देताना स्वतःचे मोठेपण लपवतात. राजकारणात जी श्रेय घेण्याची लढाई आहे त्याच्या पार पलीकडे नितीनजी सारखा व्यक्ती समाजहितासाठी ध्रुव ताऱ्यासारखा अढळ उभा आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची आणि निश्चितपणे कौतुकाची बाब आहे.
गडकरींच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू म्हणजे ते योग्य कामासाठी योग्य ती माणसे निवडून फोनवरूनच त्यांना कामाला प्रवृत्त करतात. त्यांच्या शब्दाखातर अनेक उद्योगपतींनी या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपापले योगदान दिले आहे. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे वर्धा स्थित डॉ. महेंद्र क्षीरसागर यांचे द्वारा संचालित जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीस त्यांच्या विनंतीवरून अगदी अल्पावधीत नाना प्रयत्न करून केवळ ४-५ दिवसात रेमेडिसिवीर या कोरोनासाठी उपयुक्त इंजेक्शन निर्मितीचा परवाना मिळवून दिला. या कारखान्यात एप्रिल अखेरपासून प्रतिदिन ३० हजार रेमेडिसिवीर इंजेक्शन्सच्या व्हॉयल्स उत्पादित करण्याचे सुरु झाले असून ही इंजेक्शन्स विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध होऊ
लागतील. याशिवाय सनफार्मा, मायलन व्हिटारीस इंडिया या फार्मा कंपनीच्या संचालकांशी दूरध्वनीवरून स्वतः चर्चा करून त्यावेळेस विदर्भात जाणवत असलेल्या कोरोनाविरोधी रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या ज्यादा बाटल्या विदर्भाला उपलब्ध करून दिल्या. या सगळ्या मागणी व पुरवठ्याच्या गदारोळात त्यांची सकारात्मक मानसिकता भक्कमपणे त्यांना कार्यप्रवण करत आहे. ते म्हणतात आपण सर्वजण सकारात्मकतेने वागून कोरोनावर विजय मिळवू.
स्वामी नारायण मंदिर व्यवस्थापनाचे विश्वस्तांशी आभासी पद्धतीने संपर्क साधतांना गडकरी म्हणतात, या प्रसंगी आमचा आत्मविश्वास अधिक शक्तिशाली असला पाहिजे यासाठी आपल्या सारख्या मान्यवर साधुसंतांनी समाजमनाला त्यांचा आत्मविश्वास जागरणाचा मंत्र दिला पाहिजे त्याची आज आवश्यकता आहे. नितीनजींच्या या भूमिकेचे आणि कार्याचे स्वामी नारायण मंदिराच्या साधुसंतांनी मनापासूनकौतुक केले आणि आपले मंगलमय आशीर्वाद पण दिले.
याशिवाय आपल्या दैनंदिन कर्तव्याचाही नितीनजींनी स्वतःला क्षणभर विसर पडू दिला नाही. याच काळात त्यांनी देशाच्या अति पूर्वोत्तर अश्या ७ राज्यांमध्ये जिथे आरोग्यसेवा परिवहन सेवा भोगोलिक कारणांमुळे प्रगत होऊ शकली नाही अश्या सेव्हन सिस्टर स्टेट्समध्ये अद्ययावत अशा ९० रुग्णवाहिका आपल्या खात्याच्या सीएसआर निधीतून जवळपास १८ कोटी ६३ लाख रुपये खर्चून त्या राज्यांना हस्तांतरित केल्या आणि ह्या संकटकाळात आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे साधन सहजपणे उपलब्ध करून दिले आहे. या राज्यांमध्ये मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, जम्मू-कश्मीर, लडाख, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान निकोबार व आसाम ही राज्ये आहेत.
या सोबतच गेल्या एप्रिल महिन्यात आपल्या खात्याच्या वतीने गृह राज्यात रस्ते व पुलांच्या बांधकाम व रास्ता रुंदीकरण या कामांसाठी केंद्रीय महामार्ग व वाहतूक परिवहन मंत्रालयाचे मंत्री नितीनजींनी राज्यांमध्ये एकूण २७२ प्रकल्पांसाठी केंद्रीय मार्ग निधी २०२१ अंतर्गत २०४० कोटी रुपये मंजूर करवून घेतले आहे.
यापैकी विदर्भातील अमरावती,अकोला,भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,गोंदिया,वर्धा,यवतमाळ आणि वाशीम जिल्यातील रास्ता व पूल बांधकाम आणि रुंदीकरणाचे ७७ प्रकल्प यादीत समाविष्ट करून १०२८ कोटी रुपये विदर्भासाठी तरतूद केली आहे. तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या ५४ प्रकल्पांना आणि त्यासाठी ४५९० जोती रुपये खर्चून राज्यात ८२९ किलोमीटर लांबीचे महामार्ग नव्याने निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे. यामध्ये नागपूर-आरमोरी, सिल्लोड-जळगाव, गोंदिया पूर्व बायपास व राजेगाव ते गोंदिया साकोली, गडचिरोली आष्टी आलापल्ली सिरोंचा व गुज्जीगुड्डम या आंध्रप्रदेशातील गावापर्यंतच्या रस्ता निर्माणाची कामे सुरु झाली आहेत. स्थळाअभावी गडकरींच्या राज्यांसमवेत देशातील रस्ता विकासाची महामार्ग बांधणीच्या कामाचा उल्लेखपण करता येत नाही.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबईच्या विकासासाठी व वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी बांधलेल्या ६६ उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (जो आता जुना ठरला आहे) तो त्यावेळी बांधतांना जे द्रष्टेपण (विरोध पत्करूनही) नितीन गडकरींनी दाखविले. ते आजही तेव्हडेच कौतुकास्पद आहे. म्हणूनच गडकरींना टोपण नाव जनतेने दिले आहे ते म्हणजे रोडकरी ह्या टोपण नावाचा विनम्र भावाने स्वीकार करीत नितीनजींनी विकासाचा राजमार्ग उभा करण्याचा जो संकल्प सोडला आहे त्याचा ते सर्व शक्तीनुसार आजही पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.
त्यांच्या आजच्या ६६व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या या अफाट कार्याचा आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न म्हणजे गागर में सागर भरने जैसा है. परंतु तरीही त्यांच्या कार्याला व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा ठरो ह्या हेतूने हा लेखन प्रपंच ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगावयाचे झाले तर नितीनजींच्या ठायि, हे हृदयीचे ते हृदयी अशा कोमल हृदयी आणि कर्तव्य कठोर नितीनजींना असेच जनहितार्थ कार्य पार पाडण्यासाठी निरामय दीर्घायुरारोग्य लाभो हीच समस्स्त जनतेची इच्छा आहे. हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

चंद्रकांत क्षीरसागर

Leave a Reply