मंत्रालयासमोर आंदोलन करू बघणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

मुंबई : २४ मे – आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षण मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण त्याआधीच या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात असंतोषाची लाट आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजाकडून तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून शंका उपस्थित केल्या होत्या. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर आंदोलन करून हे आंदोलक आपला निषेध जाहीर करणार होते. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, माता रमाबाई पोलीस स्टेशन मध्ये या आंदोलकांना नेण्यात आले आहे.
5 जूनला आंदोलनाचा इशाराशिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली नसल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. त्याविरोधात 5 जूनला मराठा समाजाकडून मोर्चा काढला जाईल, असा इशारा विनायक मेटे यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र मराठा समाजाने कोरोना काळात कोणतेही मोर्चे काढू नयेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुढील कायदेशीर लढाईसाठी राज्यसरकार तयार असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा समाजाला आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply