‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही – जयंत पाटील

कोल्हापूर : २४ मे – आत्तापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली, पण ‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही. सरकार ज्या शिफारशी करते, त्या राज्यपालांनी मान्यच करायच्या असतात,’ असं परखड मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात आज मांडलं.
बारा विधान परिषद सदस्यांच्या विषयावर बोलताना जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, आम्ही स्वतः बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. अनेकदा त्याची आठवण करून दिली आहे. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी आम्हाला खासगीत सांगितल्या. त्या इथे आम्ही उघड करू शकत नाही. तरीही प्रस्ताव नसल्याचे सांगत असतील तर हे फारच आश्चर्यकारक आहे . राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुद्दाम असे करतात असे मी म्हणणार नाही. १२ सदस्यांची पदे बराच काळ रिक्त आहेत, याचं शल्य जनतेला आहे. त्यामुळे रोष वाढत आहे. म्हणून तर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे.

करोना व कोकणात येऊन गेलेल्या वादळा संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे सरकारवर टीका करत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारने करोनाचा विषय अतिशय चांगला हाताळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रंदिवस कार्यरत आहेत. मुंबई, पुणे यासह राज्यभर करोनावर काही प्रमाणात मात करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती सुधारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षाचे काम करताना सरकारचं कौतुक करणं बहुतेक त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते टीका करत असतील. कोकणात वादळ येऊन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. लवकरच त्यांना योग्य मदत दिली जाईल.’

Leave a Reply