आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू – संजय राऊत यांचा टोला

मुंबई : २३ मे – ‘भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोरोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय? असा परखड सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी गंगेत आढळून आलेली प्रेत आणि कोरोनाच्या परिस्थितीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला 400 जागा मिळतील. पण आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू! लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
हिंदुस्थानातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला, असंही राऊत म्हणाले.
‘प. बंगालात सीबीआयचे लोक घुसले व त्यांनी बेकायदेशीरपणे ममता सरकारातील दोन मंत्री व दोन आमदारांना अटक केली. या मंत्र्यांना अटक करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांनी दिलीच नव्हती. मुळात ज्या प्रकरणात या अटका झाल्या त्या ‘नारदा’ स्टिंग प्रकरणात भाजपचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेन्दू अधिकारी या पलटीरामाचे नाव आहे. अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे त्या चित्रफितीत दिसते. पण हे अधिकारी महाशय ममतांना सोडून भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. राज्यपाल धनकड यावर मौन बाळगून आहेत व त्यांची नौटंकी चालू आहे. ‘नारदा’ने पकडलेल्या सहाच्या सहा लोकांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असते तर सीबीआयच्या कारवाईवर कोणीच प्रश्न विचारले नसते. पण भाजपमध्ये गेले ते सुटले हा मुद्दा आहे. ममता बॅनर्जी या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या याचा सूड घेतला जात आहे’, अशी टीकाही राऊत यांनी केली.
‘मोदीजी, आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?’ अशी विचारणा करणारी पोस्टर्स दिल्लीच्या भिंतीवर कुणी तरी चिकटवली आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या 25 गरीब मुलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात डांबले. आता मुंबईत काँग्रेसने तीच पोस्टर्स उघडपणे लावली. देशात लसीचा तुटवडा आहे व लसीकरण थांबले आहे. हिंदुस्थान सगळय़ात मोठा ‘व्हॅक्सिन उत्पादक’ देश आहे. सरकारने 12 एप्रिलला ‘लस उत्सव’ साजरा केला, पण लसीचा ठणठणाट होता. गेल्या 30 दिवसांत लसीकरणात 80 टक्के घसरण झाली. पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या कंपन्यांत जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी हिंदुस्थानातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे हिंदुस्थानात बनलेली ही लस आधी मोठ्या प्रमाणावर परदेशात पोहोचली व हिंदुस्थानात प्रेतांचे खच पडले. मुडदे गंगेत तरंगत राहिले. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ हा प्रश्न त्यामुळे चुकीचा ठरत नाही, असंही राऊत म्हणाले.
‘राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रूपात वाहताना आणि तरंगताना आपण पाहिला. यावर जे बोलतील ते आता राष्ट्रद्रोही ठरतील. संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका ‘मास्कमुक्त’ झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळविला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली. आता कोरोनाची तिसरी लाट येत आहे. काय सांगावे? लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आमच्या राज्यकर्त्यांकडे नाही. गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Leave a Reply