स्वर्गीय अमर महाशब्दे – भावपूर्ण श्रद्धांजली

(नागपुरातील पत्रकार मुद्रांतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अमर महाशब्दे यांचे ९ मे २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले आज त्यांच्या तेरावी निमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि अमर महाशब्देंचे सख्खे मित्र सुधीर पाठक यांनी जागवल्या आहेत त्यांच्या आठवणी)
अमर महाशब्दे म्हणजे निखळ निरागसता जपणारी व निरागस हसू सदैव चेहऱ्यावर जपणारी आगळीवेगळी व्यक्ती. अमरची निरागसता हे त्याचे वैशिष्ठ्य होते तसेच त्याचे यंत्रप्रेमही सर्वत्र गाजत असे. कुठलेही यंत्र असो ते अमरशी बोलत असे. त्या यंत्राची नाराजी अमरला दिसत असे आणि अगदी बोलता बोलता सहज ती नाराजी दूर करून त्याला चालायला, बोलायला लावीत असे. यंत्र व तंत्र कुठलेही असो ते अमरच्या स्नेहपरिघात येत असे मग ते घड्याळ असो की चक्रमुद्रण करणारे गेस्टेटनर कंपनीचे अत्याधुनिक मशीन असो, अमर त्या सर्वांच्या मित्रपरिवारात राहत असे. अनेकदा तर कंपनीच्या अभियंत्यालाही न जमणारी दुरुस्ती अमर करून टाकीत असे.
त्याचे यंत्रप्रेम त्याने जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपले. नव्हे मृत्यूनंतरही आपले तंत्रस्नेहीत्व मुलगा अभिजित व सून पल्लवी यांच्या माध्यमातून कायम ठेवले. कोविड-१९ ने ९ मे ला निधन झाल्यावर त्याचा मृतदेह व नंतर होणारे अंत्यसंस्कार विधी व १३व्या दिवसाचे सर्व धार्मिक उपचार झूम तंत्राद्वारे त्याचे सर्व स्नेही आप्तजन व परदेशस्थ मुलगा अक्षय व सून मुक्ता यांनाही बघता आले. नव तंत्रमंत्राबाबत व यंत्र स्नेहाबाबत अमरचे वेगळेपण त्याच्या मृत्यूनंतरही अधोरेखित झाले.
अमरकडे खूप वर्षांपूर्वी म्हणजे ५० वर्षांपूर्वी लॅम्ब्रेटा – ४८ ही स्वयंचलित गाडी होती. तिची दुरुस्तीही तोच करीत असे. नंतर त्या गाडीचे सुटे भाग मिळणे बंद झाल्यावर त्याने त्या गाडीचे सर्व भाग आतापावेतो जपून ठेवले होते. याच यंत्रप्रेमामुळे संघ परिवाराच्या कुठल्याही शिबिरात वा अधिवेशनात संमेलनाची सायक्लोस्टाईलिंगची जबाबदारी अमरवर राहत असे. विद्यार्थी परिषदेचे गोंदिया, अकोला येथील प्रांत अधिवेशन असो की राष्ट्रीय अधिवेशन असो त्यात अमर ही जबाबदारी सांभाळतांना दिसत असे.
विद्यार्थी जीवनानंतर पत्रकारिता करताना तो तरुण भारत, नागपूर पत्रिका व सकाळ या दैनिकात होता पण तरीही चक्रमुद्रण व त्यापुढील मुद्रणतंत्रावर त्याची अधिसत्ता चालत असे. यामुळेच आणीबाणी काळात आणीबाणी विरोधी पत्रके छापण्याचा तो प्रमुख होता. त्यातच त्याच्या छापखान्यावर धाड पडली व त्याला नाशिक कारागृहात जवळ जवळ दीड वर्ष घालवावी लागली. आणीबाणी उठताच त्याची मुक्तता झाली. वास्तविक तो काळ त्याच्या जीवनात खूप नाजूक होता. फेब्रीवारी ७५ ला त्याचा विवाह श्रद्धाशी झाला होता नवीन बाळाच्या आगमनाची चाहूल लागली होती. नवीन बाळाला म्हणजे अभिजीतला त्याने पहिल्यांदा बघितलं ते मार्च-एप्रिल ७६ मध्ये परीक्षेसाठी पॅरोलवर आला तेव्हाच. अक्षयला बघायला त्याला कारागृह, स्थानबद्धता यातून मुक्त होण्याची वाट बघावी लागली.
अमरचे वैशिष्ठ्य होते की, कोणतेही काम तो घाईगर्दीत, धावपळीत करीत नसे. अगदी वृत्तपत्राच्या कचेरीत येतानाही सुपारी, तंबाखू याची चंची भरलेली राहत असे. कार्यालयात जायचे म्हटले की चंची भरण्यापासून त्याची तयारी सुरु होत असे. अडकित्ताही बरोबर ठेवला जात असे. तसेच ऑफिसला येताना अतिशय देखणे ४,५ पेन तो तयार करून घेत असे.
मुळातूनच कलावंताचा त्याचा पिंड होता म्हणून तो गातही चांगला असे. कधीही त्याला राग आला आहे असा अनुभव आला नाही पण तो रुसत मात्र नक्की असे.
असा हा अमर अगदी सहजतेने कोणाचाही मित्र होऊन जात असे. त्या बाबतीमधील त्याची सहजता कायम लक्षात राहावी अशी होती. असा हा जगमित्र, निखळ निरागसता जपत आता आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. आज तेरवीला त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

सुधीर पाठक

Leave a Reply