चंद्रपुरात बालकांसाठी रुग्णालय उभे करा – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : २० मे – आरोग्य संसाधनांच्या अभावी जिल्ह्य़ात १३००च्या वर मृत्यू झाले आहेत, तसेच करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना धोका संभवणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना म्हणून बालकांसाठी एक रुग्णालय तयार करावे, सीएसआरच्या माध्यमातून निधी घेऊन करोनाच्या या लढय़ात उत्तम कार्य करावे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महापालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयाचे उदघाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला खा. बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, शीला चव्हाण, आयुक्त राजेश मोहिते, विनोद दत्तात्रय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी भरीव कार्य केले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नासंदर्भात उपाययोजना केली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत गोरगरिबांना मदतीसंदर्भात देखील उत्तम कार्य केले आहे. यापुढे त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात उत्तम काम करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले. पालकमंत्री वडेट्टीवार, नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांनी महापालिकेच्या या कार्याचे कौतुक केले. करोना काळात समाजातील सर्वच घटक आपापल्या परीने योगदान देत आहेत. कोविड रुग्णालय स्थापन करून त्या माध्यमातून कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा महापालिकेचा पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खा. धानोरकर म्हणाले.

Leave a Reply