खा. राजीव सातव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंगोली : १७ मे – काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले.पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या जाण्यानं राजकीय वर्तुळात एक पोकळीच निर्माण झाली आहे.राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसले आहे, अशा शब्दात अनेक नेते मंडळींनी दु:ख व्यक्त केले आहे. राजीव सातव 2014 साली हिंगोली लोकसभा मतदार संघातून खासदारपदी निवडून आले होते. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवले होते.काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचे पक्षात वजन होते. याशिवाय ते टीम राहुलचे कोअर कमिटी सदस्य होते.

Leave a Reply