मी कांगावेखोरांना उत्तर देत नाही – देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

अकोला : १६ मे – देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे, असं आव्हान काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पटोले यांची ही टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चांगलीच झोंबलेली दिसतेय. फडणवीसांनी या टीकेची दखल घेत पहिल्यांदाच पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज अकोल्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांच्यावर टीका केली. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतेही. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे पटोले यांच्या कोणत्याही प्रतिक्रियेवर फडणवीस प्रतिक्रिया देणं टाळतात. पटोले हे महाराष्ट्रातील राहुल गांधी आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं अशी फडणवीस हेटाळणी करत असतात. मी पटोलेंना महत्त्व देत नाही, त्यांच्या प्रतिक्रियेची काय दखल घ्यायची, असंही ते म्हणत असतात. मात्र काल पटोले यांनी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी उत्तर दिलं. यावरून पटोलेंची टीका झोंबल्यानेच फडणवीस बोलते झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
अमरावतीत तिसरी लाट येणार की नाही, असं काही अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याला तयारी करावी लागेल. ही तिसरी लाट लहान मुलांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा तयार ठेवाव्या लागतील, असं त्यांनी सांगितलं.
अकोल्यातील व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर अनेक नेते काहीच करत नाहीत. ते फक्त कांगावा करत आहेत. केवळ निकृष्ट, निकृष्ट असल्याचं सांगत आहेत. मोदींनी राज्याला व्हेंटिलेटर दिले नसते तर काय झाले असते? अकोल्यात टेक्निशियन दिला आणि लगेच व्हेंटिलेटर सुरू झाले. टेक्निकल गोष्टी कशाही डम्प केल्या की त्या सुरू होणार नाहीत, असंही ते म्हणाले.
ग्रामीण भागात कोरोनाच संसर्ग वाढला आहे. आमदारांच्या फंडातून आरोग्य सुविधांसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा पैसा देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा अजून गतिमान झालेली नाही, असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्ण संख्या वाढली आहे. त्याही पेक्षा मृत्यू संख्या वाढत असल्याने ही चिंताजनक बाब आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले

Leave a Reply