नरेंद्र मोदी यांची राजीव सातव यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : १६ मे – राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज (१६ मे) कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (१६ मे) सकाळी ५ वाजता कोरोनामुळे निधन झाले. गेल्या २३ दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या २३ दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

Leave a Reply