चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे – संजय राऊत

मुंबई : १५ मे – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, वादळ येते आणि जात असते. मात्र, या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेले कोरोना वादळ मोठे आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
चक्रीवादळापेक्षाही या देशात कोरोनाचे वादळ निर्माण झाले आहे. कोरोनाच्या या वादळाने रोज रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ते थांबवणे गरजेचे आहे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा काल (शुक्रवारी) दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016-17 साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, देशांमध्ये कोणाचे फोन टॅप होत नाही हे सांगा. आमचेदेखील झाले आहेत आणि आतादेखील होत असतील. हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मात्र, ही काही मोठी गोष्ट नाही. नाना याबाबत घाबरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply