ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृद्धाने घेतला पिंपळाच्या झाडावर आश्रय

इंदूर : १५ मे – कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची अत्यावश्यक गरज निर्माण झाली. देशात अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मध्यप्रदेशातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या इंदूरमध्ये एका वृद्धाने ऑक्सिजन मिळवण्यासाठी चक्क पिंपळाच्या झाडावर आश्रय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून त्यांनी स्वत:ची ऑक्सिजन पातळी कायम ठेवण्याचा एक रामबाण उपायच जनतेसमोर ठेवला आहे.
इंदूरमधील रंगवासा या गावातील राजेंद्र पाटीदार यांचे वय ६८ वर्ष आहे. या कोरोना काळात ऑक्सिजन पातळी कायम राखण्यासाठी रांजेंद्र पाटीदार यांनी २४ तास ऑक्सिजन उसर्जित करणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. दिवसभरात पाटीदार यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाटीदार पिंपळाच्या झाडावर चढून तिथेच खुर्ची टाकून बसतात. या वयातही पाटीदार सहजपणे झाडावर चढतात आणि उतरतात. झाडावर बसलेल्या राजेंद्र पाटीदार यांचा नातू त्यांना काही आवश्यक असल्यास वस्तू पोहोच करतो.
शेती व्यवसाय करणार राजेंद्र पाटीदार यांच्या घराशेजारीच ३ पिंपळाची झाडे आहेत. त्यातील एक त्यांच्या घराला चिटकूनच आहे. रुग्णालयात कोरोना रुग्ण ऑक्सिजनच्या तुटवड्याने मरत असल्याच्या बातम्या ज्यावेळी पाटीदार यांच्या ऐकण्यात आल्या, त्यानंतर त्यांनी २४ तास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून त्यांचा अधिवास हा पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात आहे. राजेंद्र सांगतात की मी पिंपळाच्या झाडावर बसत असल्यानेच आज माझी ऑक्सिजन लेव्हल (spo2) 99 वर स्थीर आहे. तसेच झाडावर चढ उतर केल्याने एक प्रकारे व्यायामही होत असल्याचे पाटीदार सांगतात.
दिवसभरात पाटीदार यांना केव्हाही झाडावर जावे असे वाटते, तेव्हा ते लगेच खुर्ची घेऊन झाडावर जाऊन बसतात. झाडावर बसल्याबसल्या ते शुद्ध ऑक्सिजन घेत, कपाल भाती, प्राणायाम आणि योगा करतात. गेल्या १५ ते २० दिवसांपासून त्यांचा हा नित्यक्रम झाला आहे. यासाठी पाटीदार यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यही मदत करतात. याचबरोबर पाटीदार यांचे सुदृढ आरोग्य पाहून गावकरीही त्यांच्या या पिंपळाच्या झाडाच्या सानिध्यात राहण्याचे कौतुक करतात.
राजेंद्र पाटीदार यांच्याकडे कोणाला काही काम असेल आणि कोणी भेटण्यास आले तरी पाटीदार झाडावरून त्यांच्याशी संवाद साधतात. पिंपळाच्या सानिध्यात जे लोक राहतात त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. तसेच या लोकांना कोरोनादेखील होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ही प्रेरणा घेऊन त्यांच्या गावातील अनेक नागरिकांनी पिंपळाच्या सानिध्यात राहून स्वत:चा ऑक्सिजन लेव्हल स्थीर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

Leave a Reply