लस उत्पादनासाठी मंत्र्यांनी फाशी घ्यावी काय? – केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : १४ मे – देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे काही राज्यांमधील कोरोना लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आलीय. अशावेळी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादळ उठलंय. कोरोना लसीच्या तुटवड्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरुन सदानंद गौडा भडकले. लसीचं उत्पादन होत नसेल तर सरकारमधील लोकांनी स्वत:ला फाशी घ्यावी काय? असं वक्तव्य गौडा यांनी केलं आहे.
न्यायालयाने चांगल्या भावनेतून देशातील सर्वांना कोरोना लस दिली जावी असं म्हटलंय. मी तुम्हाला विचारतो की उद्या न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला एवढ्या लस द्यावा लागतील आणि लसीचं उत्पादन होऊ शकलं नाही. तर आम्ही फासावर लटकावं काय?, असं वक्तव्य गौडा यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. लसीच्या तुटवड्यावर बोलताना गौडा यांनी सरकारची कार्यवाही, योजनेवर जोर दिला. असे निर्णय कुठलाही राजकीय लाभ किंवा अन्य कारणांमुळे होत नाहीत. सरकार आपलं काम पूर्ण इमानदारी आणि निष्ठेनं करत आहे. या दरम्यान काही त्रुटी समोर आल्या आहेत, असं गौडा म्हणाले.
ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात विविध कंपन्यांच्या कोरोना लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. इतकंच नाही तर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनसह अन्य सहा कंपन्यांच्या कोरोना लस भारतात उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलंय. “भारतात भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी पेक्षा जास्त डोसची निर्मिती केली जाईल. कोणतीही लस जी WHO आणि FDA ने मंजूर केली असेल ती भारतात येऊ शकते. त्यासाठी आयात परवाना 1 ते 2 दिवसांत दिला जाईल. कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही”, असं ट्वीट जावडेकर यांनी केलंय.

Leave a Reply