मंत्रोच्चाराने कोरोना रुग्ण सुधारण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १४ मे – आधुनिक विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राला करोनावरील उपचारांसाठी अजून कोणतेही औषध सापडलेले नसताना नागपुरात मात्र मंत्रोपचाराने करोना काही क्षणात बरा करण्याचा दावा एका भोंदू बाबानं केला आहे. पोलिसांनी या भोंदू बाबाला गजाआड केले आहे. शुभम तायडे (वय ३२) असे या बाबाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत पंचशीलनगर येथे शुभम तायडे उर्फ गुणवंत बाबाचा दर गुरुवारी दरभार भरतो. दैवी शक्तीने आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो, करोनाच काय कोणताही आजार बरा करू शकतो, गुप्त धन शोधून देतो, असे दावे करणाऱ्या या बाबाचे प्रस्थ परिसरात वाढले होते. त्यामुळे अनेक लोक बाबाच्या दरबारात हजेरी लावत. काही जण बाबाला सट्ट्याचे नंबर विचारायला येत. तुमच्या घरच्या कौटुंबिक समस्या मला आधीच स्वप्नात कळतात असेही त्याने भक्तांना सांगितले होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निमूर्लन समितीला याबाबत कळताच त्यांनी आधी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. बाबाचा दरबार दर गुरुवारी सायंकाळी ६ नंतर भरतो. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी रात्री ९ वाजता बाबाचा दरबार गाठला. त्या आधीच एक बनावट भक्त आपली समस्या घेऊन बाबाकडे पाठविला होता.
करोना पॉझिटिव्ह रुग्ण बाबा काही क्षणात निगेटिव्ह करतो, असे तेथील भक्त सागंत होते. काही वेळातच बाबाच्या अंगात शेषनागर संचारला. त्यानंतर तो आळोखे- पिळोखे देत जमिनीवर लोटांगण घेऊ लागला त्याचवेळी पोलिस तेथे पोहचले. त्यांनी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ अ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. सध्या लॉकडाऊन असतानाही बाबाच्या या दरबारात किमान ५० जण हजर होते. त्यामुळे तोही गुन्हा दाखल झाला. तायडेला अटक करून पोलिस स्टेशनला आणले त्यावेळी त्याच्या भक्तांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली व बाबाला सोडा अशी मागणी ते करू लागले.
आपल्याला अटक होणार हे जर बाबाला अंतर्ज्ञानाने कळले नाही तर तुमच्या समस्या त्याला काय कळणार, असे पोलिसांनी त्याच्या भक्तांना समजावून सांगून परत पाठविले. यावेळी अंनिसेच महासचिव हरीष देशमुख, महिला संघटिका छाया सावरकर, महानगर सचिव नरेश निमजे उपस्थित होते.

Leave a Reply