पंतप्रधान मोदी नियोजन करण्यात चुकले – बच्चू कडूंची टीका

अहमदनगर : १३ मे – ‘महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला सांगत होते की भारतातील कोरोना गेला, पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
राज्यमंत्री बच्चू कडू हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले होते. अहमदनगरमध्ये प्रहार जनशक्तीच्या वतीने कोविड केअर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणींची समजून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली.
‘देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे. जर पंतप्रधान मोदींनी देशभरात योग्य नियोजन केले असते तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
‘केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकारकडे जाऊन काही निवेदन दिले आहे का किंवा केंद्राकडून काही मदत आणली आहे, असं कुठेही झालं नाही. त्यांनी जर काही मदत आणून दिली असती तर तेवढाच हातभार लागला असता. पण, भाजपच्या नेत्यांना राज्य सरकारवर टीका करण्याशिवाय काहीच केले नाही, अशी टीकाही बच्चू कडू यांनी फडणवीस यांच्यावर केली.
‘केंद्र सरकारकडून दुजाभाव होत आहे. पण तरी सुद्धा राज्य सरकारने चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. देशात सर्वात चांगले व्यवस्थापन राज्यामध्ये आहे. जगभरात महाविकास आघाडी सरकारचे कौतुक होत आहे. इतर राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. इतर राज्यांपेक्षा आपली व्यवस्थाही चांगली आहे’, असंही बच्चू कडू म्हणाले.
‘महाराष्ट्रात केंद्राकडून गरजेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याने याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली असून काही ऑक्सिजन प्लांट सुरू झाले असून काही लवकरच सुरू होतील’ अशी माहिती बच्चू कडूंनी दिली.
‘कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मेळघाटमध्ये आदिवासी पट्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कमी पडली आहे, अचानक वाढलेल्या संख्येमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

Leave a Reply