बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

गोंदिया : १२ मे – गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातंर्गत येणार्या कोहमारा बीटातंर्गत घोगलघाट शिवारात मृत म्हशीवर विषारी औषध टाकून बिबट्याची शिकार केल्याची घटना ११ मे रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे, बिबट्याचे चारही पाय व दात कापण्यात आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रातंर्गत मोडणार्या किंवा जंगलाला लागून असलेली शेती वा गावांमध्ये मागील काही वर्षात संचार वाढला आहे. परिणामी वन्यजीवांकडून शेतपीकांच्या नुकसानीसह पाळीव जनावरांची शिकार तसेच वन्यजीवांची शिकार्यांकडून शिकार होण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र या प्रकारावर आळा घालण्यात वन्य व वनविभाग उदासिन असल्याने शेतकरी, नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातो. अशाच रोषातून एका शेतकर्याने मृत्यमुखी पडलेल्या आपल्याच म्हशीच्या अंगावर थायमेट हे विषारी औषध टाकून बिबट्याची शिकार केल्याची घटना कोहमारा वनविभागातील घोगलघाट येथे 11 मे रोजी समोर आली.
काही दिवसापूर्वी घोगलघाट येथील शेतकरी सुकलदास तोरणकर याच्या म्हशीची शिकार केली होती. याचा राग मनात ठेवून त्याने मृत म्हैस शेतातच ठेवून तिच्यावर विषारी औषध टाकले. दरम्यान, म्हशीचा मृतदेह खाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. ही बाब आज सकाळी 9 वाजता समोर आली. विशेष म्हणजे, बिबटच्या चारही पाय व दात कापलेले होते. घटनेची माहिती मिळताच सहायक उपवन संरक्षक प्रदीप पाटील, वन परीक्षेत्र अधिकारी पंचभाई, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे घटनास्थळी पोहोचले व बिबटच्या शवाचे शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी सुकलदास तोरणकर व संदीप तोरणकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी आपण मृत म्हशीवर विषारी औषध टाकल्याची कबुली दिली असून बिबट्याचे पाय व दात कापले नसल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक उपवन संरक्षक प्रदीप पाटील करीत असून तपासाअंती बिबट्याच्या कापलेल्या पाय व दातांचे रहस्य समोर येणार आहे.

Leave a Reply