तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याची आम आदमी पक्षाची मागणी

नागपूर : १२ मे – कोरोनानं देशात हाहाकार माजवलेला असून, महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूनही त्याला आळा घालणं सरकारला शक्य होत नाहीये. नागपुरातही कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला असून, मृतांची संख्याही वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता तुकाराम मुंढेंना परत बोलावण्याची मागणी जोर धरत आहे. नागपुरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्त म्हणून चांगलं काम केलं आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवलं, मात्र आता नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिघडली असल्याने पुन्हा तुकाराम मुंढे यांना नागपुरात आणा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केलीय. तसेच त्यासाठी शहरभरात तुकाराम मुंढे यांचे पोस्टरही लावलेत. त्यांना पुन्हा नागपूर आयुक्त म्हणून आणावं, अशी मागणी केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वाधिक झळ नागपूर शहर आणि जिल्ह्याला बसली आहे. येथे रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहेत. तर दुसरीकडे मृतांचे प्रमाणसुद्दा बरेच आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही परतलेली नाही. तसेच कोरोना रुग्णांवर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तसेच नितीन राऊत यांनी मोठे निर्णय घेतले आहे. या निर्णयानुसार नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा बंद करण्यात आलायत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्यांना तब्बल १४ दिवस सोडू नये, अस राऊत यांनी सांगितलं होतं.
नागपूर जिल्हा परिषदेवर २००८ साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं. नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

Leave a Reply