जुळ्या भावांचा आठवडाभरातच झाला मृत्यू

नागपूर : १२ मे – कोरोना विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोरोनामुळे सर्वच समाजजीवन ढवळून निघत आहे. अनेक उद्योग, व्यापार बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. टाळेबंदी, संचारबंदी असूनही कोरोनाचा उद्रेक कमी होताना दिसत नाही. त्यातच कोरोना महामारीने अनेकांना प्राण गमवावे लागले. अशीच हृदयद्रावक घटना दत्तवाडी परिसरात घडली. येथे अभियंता असलेल्या जुळ्या भावांचा आठवडाभरातच मृत्यू झाला. त्यामुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वी पती गेल्याचे दुःख कमी झाले की काय आज अभियंता असलेली दोन्ही मुले काळाच्या पडद्याआड गेली.
दत्तवाडीतील सत्यसाई सोसायटीमधील मंगला बंडूजी मेश्राम यांची 22 वर्षांची जुळे मुले गौरव व सौरभ. दोघांनाही कोरोना आजाराने ग्रासले होते. सौरभचे शुक्रवार 7 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले तर गौरवचे मंगळवार 11 मे रोजी कोरोनामुळेच निधन झाले. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे दोन्ही भावांना दहा दिवसांपूर्वी आठवा मैल येथील खाजगी कोविड केंद्रामध्ये भरती करण्यात आले होते.
या दोन्ही भावांना एक बहीण होती. सौरभ व गौरव हे संगणक अभियंता होते. दोघेही पंजाबमधील मोहाली येथे आयटी कंपनीत नोकरीला होते. संचारबंदीमुळे दोघेही घरूनच काम करीत होते. सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले. आई मंगला मात्र दोन्ही मुले गेल्यामुळे शोकसागरात बुडाल्या. उच्चशिक्षित गौरव व सौरभ यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply