पालकमंत्र्यांनी केले केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण

नागपूर : ११ मे – नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे संयुक्त रुपाने संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. त्यांच्यासोबत आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जेष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे सेंट्रल कंट्रोल रूम मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सुरू करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी विविध कोविड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, विविध कोविड रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठ्याकरीता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. पालकमंत्री यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, तसेच त्यांना रिअल टाईम माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याबद्दल सूचना केली. यावेळी मनपा आयुक्तांनी नियंत्रण कक्षाच्या कामाबद्दल माहिती दिली.
मनपा मुख्यालयात सुरू करण्यात आलेली ही कंट्रोल रूम २४ तास सुरू आहे. येथे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात, तसेच खासगी रुग्णालयांत (80% क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रूममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल. शिवाय कंट्रोल रूममधून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णांना दाखल करण्यास रुग्णालयाला नकार देता येणार नाही.
कंट्रोल रूममधून बेडच्या उपलब्धतेसंदर्भात सातत्याने माहिती घेतली जाते. फोनच्या माध्यमातून कंट्रोल रूमशी संपर्क साधता येते. टेलिफोन क्रमांक ०७१२ – २५६७०२१ (१० लाईन उपलब्ध करण्यात आले आहे.) तसेच, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रुग्णांची विविध माहिती ७७७००११५३७, ७७७००११४७२ या नंबरवर पाठवता येईल. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाचा एसपी ओ २ लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकांवर व्हॉट्सॲपवर पाठविता येईल. यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने लवकरात लवकर रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संबंधित रुग्णालयाला देखील याची पूर्वसूचना दिली जात आहे. अतिगंभीर स्वरुपातील कोविड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत कंट्रोल रुमला याबाबत माहिती देणे संबंधित रुग्णालयास बंधनकारक आहे. तथापी, या सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाईस पात्र राहील, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply