मराठा समाज बांधवांच्या वतीने बीडमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची होळी

बीड : १० मे – मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निकालाची होळी केल्याची घटना बीड येथे सोमवारी घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हळूहळू बीडमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याबाबत मराठा समाज बांधवांच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना आरक्षण मागणी बाबतचे निवेदनही देण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल मराठा समाजावर अन्याय करणारा असल्याचे सांगत बीडमध्ये सोमवारी मराठा समाज बांधवांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची होळी केली आहे.
महाराष्ट्रातील मागील सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण असंवैधानिक आहे, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला होता. ’50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे हे राज्यघटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे हे कायद्याचे उल्लंघन आहे’, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. तर अनेकांनी न्यायालयाच्या विरोधात जाऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होताना दिसत आहे. याचे पडसाद नुकतेच बीडमध्ये दिसले आहेत. याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची होळी केली आहे. जमलेल्या संतप्त जमावाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविरुद्ध जबरदस्त घोषणाबाजी केली आहे.

Leave a Reply