लोकांचा जीव जातोय तरी पंतप्रधानांची टॅक्स वसुली बंद होत नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली : ८ मे – देशात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही नरेंद्र मोदी सरकारकडून अजूनही कर वसुली केली जात आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबताना दिसत नाही, असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी काल पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून कोरोना संकट रोखण्यासाठी चार उपाय सांगितले होते. तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर थेट हल्ला करताना कोरोना रोखण्यात सिस्टिम नव्हे तर मोदी सरकार फेल गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज ट्विट करत थेट मोदींवर निशाणा साधला आहे. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी जीएसटी हा हॅशटॅगही वापरला आहे.
सरकारने विदेशातून येणाऱ्या कोरोना लसींवरील जीएसटी हटवला आहे. मात्र, देशांतर्गत कोरोना लसीच्या खरेदीवर जीएसटी लावला आहे. केंद्र सरकारकडून 5 टक्के जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारच्या या धोरणावरच राहुल यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. कालच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना चिठ्ठी लिहून व्हॅक्सीन खरेदी करण्यासाठी लावण्यात आलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्डचा एक डोस राज्यांना 300 रुपयांना आणि भारत बायोटॅक कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी 400 रुपये आकारत आहे. त्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे राज्यांना कोविशील्डसाठी 315 रुपये आणि कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी 420 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे राज्यांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. त्यामुळेच लसींवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी राज्यांकडून केली जात आहे. दरम्यान, केंद्राला मात्र या दोन्ही व्हॅक्सीन अवघ्या 150 रुपयांमध्ये दिल्या जात आहेत.

Leave a Reply