फडणवीस आणि दटकेंनी लसीकरणासाठी दिले प्रत्येकी १ कोटी रुपये

नागपूर : ७ मे – नागपूर शहरातील खासदार,आमदार आणि नगरसेवकांनी लसीकरणाच्या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर शहराचे महापौर दयाशंकर यांनी करताच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दटके यांनी प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचा निधी लसीकरणाकरीता महापौर सहाय्यता निधीत देत असल्याचे पत्र दिले आहे.
संपूर्ण नागपुरकरांचे सुरळीत लसीकरण व्हावे यासाठी लस खरेदीच्या निधी संकलनासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांना विनंती करण्यात आली आहे. शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून १० लाख रुपये तसेच इच्छूक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी महापौर सहाय्यता निधीमध्ये देण्यासाठी पत्र द्यावे. सर्व नगरसेवकांनी स्वच्छेने विकास निधी अथवा अन्य निधीमधून १० लाख रुपये दिल्यास लस खरेदी करण्यासाठी मनपाकडे १५ कोटी रुपयांची व्यवस्था होईल. याशिवाय शहरातील सर्व खासदारांनी त्यांच्या खासदार निधीतून दोन कोटी तर आमदारांनी आमदार निधीतून एक कोटीचे सहकार्य करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. शहरातील सर्व खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांनी निधी दिल्यास त्यातून पुन्हा १५ कोटी रुपयांची व्यवस्था होऊ शकेल, सगळा निधी मिळून १० लाख लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था नागपूर महानगरपालिका करु शकणार आहे. याशिवाय नागपूर शहरातील उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचा सीएसआर निधी लस खरेदी करण्यासाठी द्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Leave a Reply