अमरावती जिल्ह्यात १० हेक्टरवरील जंगल जळून खाक

अमरावती : ७ मे – मोर्शी तालुक्यातील खानापूर ते आष्टगाव दरम्यान असलेल्या वनविभागाच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीत १० हेक्टरवरील वृक्षसंपदा जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की , मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावरील खानापूरवरून केवळ एक किलोमीटर अंतरावर वनविभागाचे राखीव जंगल असल्याने या जंगलात वनविभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली होती . हे वन जंगल पंधरा ते वीस हेक्टर क्षेत्रात असल्याने याठिकाणी इतरही वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणावर आहे . गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान जंगला शेजारी असलेल्या शेतकर्याने शेतातील धुर्याला आग लावली असता सदर आग काही वेळातच वनविभागाच्या जंगलाला सुद्धा लागली. या आगीत वनविभागाची अंदाजे १० हेक्टरवरील वृक्ष संपदा जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मोर्शी येथील वनविभागाच्या कार्यालयाला मिळताच आष्टगाव, खानापूर बीटचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश बलोदे आपल्या अन्य कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहोचले असून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आग विझविण्यासाठी मोर्शी व चांदूरबाजार येथील अग्निशामक दलाच्या गाड्यासुद्धा बोलावण्यात आल्या आहेत. जोरदार हवा असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आहे. इतकेच नव्हे, तर आष्टगाव नजीकच्या सद्गुरू इंडस्ट्रीजमधील लाखो रुपयाचा भुसा सुद्धा जळून खाक झालेला आहे . सदर आग दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आटोक्यात आली असल्याचेही कळले आहे.

Leave a Reply