राज्यात आरोग्य विभागाची १६ हजार रिक्त पदे तातडीने भरणार – राजेश टोपे

मुंबई : ६ मे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा हा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अशा १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा ही समस्या देखील आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्याबाबतही केंद्राशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
आरोग्य विभागातील १६ हजार पदे तातडीने भरली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या 16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही टोपे म्हणाले.
लसीकरणाच्या मुद्द्यावरून टोपे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याचं म्हटलं आहे. केंद्राकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी असल्याचं टोपे म्हणाले. 45 वर्षावरील ज्या नागरीकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळं राज्यात 45 वरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याची तक्रार करताहेत. त्यामुळं राज्य सरकार याबाबत धोरणामात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे, असंही टोपे म्हणाले. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य सरकारनं खरेदी केलेले कोव्हॅक्सिन 45 वरील वयोगटातील नागरिकांसाठी देण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. केंद्रानं जास्तीच्या कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) लस द्याव्या अशी मागणी राज्य केंद्राकडं करणार आहे.

Leave a Reply