नीरीच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन तासात आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळणार

नागपूर : ६ मे – उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम आहे. अजूनही ऑक्सिजन बेड, औषधांची समस्या पूर्णपणे निकाली निघालेली नाही. त्यातच कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येण्यासाठी कधीकधी तर ४८ तास वाट बघावी लागते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बिनदिक्कतपणे फिरत असतात. हे संभाव्य रुग्ण पुढे सुपर स्प्रेडर म्हणून ओळखले जातात. या दिरंगाईवर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘निरी’कडून प्रयत्न सुरू केले. त्या अंतर्गत संभावित रुग्णांचे ड्राय स्वॅब घेऊन त्याचा कोरोना अहवाल केवळ तीन तासात दिला जात आहे. त्यामुळे रुग्णांचे बेजबाबदारपणे भटकण्याचे प्रमाण कमी झाले आहेत. याप्रकरणात माध्यमांमध्ये एक वृत्त प्रकाशित केले होते, ज्यामध्ये ड्राय स्वॅब संदर्भात उल्लेख करण्यात आला होता. त्याला अनुसरून निरीच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात संशोधन करून त्याचा उपयोग सुरू केला आहे.
नागपूर शहरात सुपर स्प्रेडर रुग्णांकडूनच कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रचार आणि प्रसार होत असल्यानेच नागपुरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही ७५ हजारांपेक्षा जास्त झाली होती. कोरोना चाचणी केंद्रांच्या बाहेर शेकडो संभाव्य रुग्णांची गर्दी आणि त्यानंतर कोरोना अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता अनेक संभाव्य रुग्ण लक्षणे असताना देखील टेस्ट करणे टाळतात आणि खासगी डॉक्टरांच्या मार्फत परस्पर औषधं घेऊन उपचार करून घेतात. त्यातही आता आरोग्य विभागाने सर्वाधिक भर हा आरटीपीसीआर चाचण्यांवर दिलेला आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवर अतिरिक्त ताण आलेला आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल दोन ते तीन दिवसांच्या विलंबाने मिळतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचं लक्षात येताच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीकडून तोडगा काढण्यात आला आहे.
संभाव्य रुग्णांच्या घसा आणि नाकाचे ड्राय स्वॅब घेतले जात आहेत, ज्याचा रिपोर्ट अवघ्या तीन तासात मिळायला सुरुवात झाली आहे. कोरोना चाचणीमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यावर उपचार देखील तात्काळ सुरू होत आल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. निरीने ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान होत आहे़. निरीच्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अशा ५४ हजार टेस्ट केल्या आहेत़.
कोरोनाचे निदान होण्यासाठी सध्या देशात सर्वत्र आरटीपीसीआर टेस्टिंग केल्या जात आहे़त. मात्र, टेस्टिंग लॅबवर आलेला ताण बघता कोरोना अहवाल येण्यासाठी फार वेळ लागत आहे. संभाव्य रुग्णांना लवकरात लवकर रिपोर्ट मिळावा या करिता ड्राय स्वॅब चाचणीचा प्रयोग नागपूरमध्ये यशस्वी झाला आहे. आरटीपीसीआर चाचणीमध्ये रुग्णांकडून घेतलेल्या स्वॅबमध्ये कोरोना विषाणूला सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट द्रवाचा उपयोग केला जातो़. मात्र, ड्राय स्वॅब टेस्टिंगमध्ये संबंधित द्रवाची गरज नाही़. या पद्धतीत ४ डिग्री तापमानातील रिकामी ट्यूब वापरली जाते़. ही ट्यूब सहज हाताळता येते़. त्याद्वारे संक्रमण होण्याची शक्यता शून्य टक्के आहे़. ही पद्धत केवळ निरी लॅबमध्ये वापरली जात आहे़. ही पद्धत सोपी असून या चाचणीचे ४० प्रयोगशाळांच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़. ड्राय स्वॅब टेस्टिंगमुळे संभाव्य रुग्णांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

Leave a Reply