चंद्रपुरात ७० लाख रुपयाचे बोगस बियाणे जप्त

चंद्रपूर : ४ मे – कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापूस (एचटीबीटी) बियाणे पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले.
या धाडीमध्ये अभिजित मानिकचंद्र दुर्गे यांनी आरोपी सोहील अब्दुल तसलिम शेख, जलनगर, चंद्रपुर याला भाड्याने दिलेल्या रूममध्ये अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापूस (एचटीबीटी) बियाणे, खाली पॉकेट व पॉकिग मशिन आढळून आले. संशयित कापूस बियाण्यांमध्ये राघवा-९ , मेघना-४५, अरुणोदया, पवनी सिडस व दंबग तसेच खुले बियाणे मोठय़ा प्रमाणावर आढळून आले. सध्याच्या शासकीय दरानुसार सदर जप्त केलेले बियाण्याची अंदाजित रक्कम ६८ ते ७0 लाख रुपये असून या प्रकरणात कृषी विभागामार्फत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक श्री. चालूरकर करीत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्य़ातील शेतकर्यांनी केवळ अधिकृत कृषी केंद्र धारकांकडूनच मान्यता प्राप्त बियाणे खरेदी करावे. तसेच कोणत्याही अनोखळी व्यक्तीकडून प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी न करण्याचे तसेच यासंबंधी अनधिकृत कृषी निविष्ठा विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्यास दूरध्वनी क्रंमाक 0७१७२-२७१0३४ किंवा 0७१७२-२५३२९७ वर तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पं.स. व पोलिस विभागास माहीती कळविण्याचे आवाहन भाऊसाहेब बर्हाटे यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अधिकारी शंकर किरवे, जिल्हा गुण नियत्रण निरीक्षक प्रशांत मडावी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, यांनी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक श्री. अंभोरे यांच्याशी संपर्क साधून उपनिरिक्षक श्री. चालूरकर व श्री. मोरे यांच्या सहकार्याने संबधित ठिकाणी धाड टाकली. सदर धाडीमध्ये कृषी अधिकारी सुशील आडे, साकेत बावनकुळे, अमोल उघडे, मकरंद लिंगे, जया व्यवहारे यांचे सहकार्य लाभले असल्याचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी कळविले आहे.

Leave a Reply