ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

नागपूर : ३० एप्रिल – विदर्भातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज दुपारी वृध्दापकालीन आजारामुळे हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षाचे होते. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मनोहर अंधारे यांनी अगदी तरुण वयात नागपूरच्या दैनिक युगधर्म मध्ये आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. वृत्तपत्रीय क्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. युगधर्म शिवाय दैनीक खबर, दैनिक देशोन्नती, दैनिक तरुण भारत, दैनिक भास्कर या वृत्तपत्रांमध्येही त्यांनी काम केले होते.
सुरुवातीपासूनच मनोहर अंधारे श्रमिक पत्रकारांच्या समस्यांबाबत जागरूक होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघ या नागपुरातील श्रमिक पत्रकारांच्या संघटनेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता अखिल भारतीय पत्रकार महासंघाचेही ते पदाधिकारी होते. १९७८ ते १९८१ या काळात ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षही होते. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांनी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.
बंद पडलेले वृत्तपत्र पत्रकारांनी सहकारी तत्वावर चालवण्याचा प्रयोग अंधारेंनी नागपुरात केला होता. १९८८ साली त्यांनी पत्रकारांची सहकारी संस्था उभी करून दैनिक युगधर्म ६ वर्ष चालवले होते. याशिवाय पत्रकारांच्या सहकारी संस्थांच्या उभारणीमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता. नागपुरात सहकारी तत्वावर पत्रकारांसाठी वसाहत उभी करण्यातही त्यांचाच पुढाकार राहिला. नागपुरात पत्रकार संघासाठी स्वतंत्र जागा मिळवून श्रमिक पत्रकार भवनचे कार्यालय उभे करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी पेलले होते.
पत्रकार म्हणून त्यांनी जगातील विविध देशांना भेटी दिल्या होत्या युरोप दौऱ्यात त्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाचेही नेतृत्व केले होते त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची विविध पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
अंधारेंच्या निधनाने विदर्भातील पत्रकारितेचे भीष्माचार्य हरपले अशी भावना व्यक्त होत आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर पत्रकार क्लब या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply