ऐका दाजिबा – विनोद देशमुख

रेम्या-डोकी-वीर ?

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळच्या दुसऱ्या लाटेत देशभर नुसता गोंधळ आहे. पहिली लाट आली तेव्हा तिचा सामना करण्यासाठी प्रत्येक गोष्ट नव्याने करावी लागली होती. तरीही आपण सावरलो. जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत- धारावीत कोरोनाला लगाम लावण्याचा चमत्कार घडवता आला. बहुतांश ग्रामीण भागात कोरोना पोहोचूही शकला नाही. त्यामुळे भयग्रस्तता फार पसरली नव्हती. यावेळी नेमके उलटे घडले आहे. परिस्थिती जवळजवळ हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये अन् गावखेड्यात सुद्धा. इस्पितळे आणि स्मशानघाट येथे जागा नाही. दोन्हीकडे रांगा ! जिवंतपणी इस्पितळात भरती होण्यासाठी भटकत राहावे लागते, तर म्रुतदेहांना अंत्यसंस्कारासाठी ताटकळावे लागत आहे. काही रुग्ण दवाखान्याच्या मार्गावरच प्राण सोडते झाले. ही स्थिती भयानक नाही, असे कोण म्हणेल ? त्यापेक्षाही ती करुण, हतबलता दाखविणारी जास्त आहे.
कोरोनाचा दुसरा वार येईल आणि इतका भीषण असेल, याची कल्पना करण्यात आपण सारेच- शासक, प्रशासक आणि जनता, कमी पडलो, असे आता प्रकर्षाने जाणवत आहे. हिवाळ्यात पहिली लाट ओसरल्यासारखे वाटल्याने सारेच बेफिकीर झाले अन् त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. दो गजकी दूरी, मास्क कम्पल्सरी, गर्दी टाळण्याची मजबुरी ही सारी “कडाई” हळूच “ढिलाई”मध्ये परिवर्तित झाली आणि पुन्हा धुमाकूळ घालायची संधी कोरोनाला मिळाली, हे आपण नाकारू शकत नाही.
शासन-प्रशासन स्तरावरही तेच झाले. पहिल्या हल्ल्यात जागोजागी कोविड सेंटर उभारून रुग्णांना त्वरेने दिलासा देण्यात आला होता. ती तत्परता यावेळी दिसत नाही. जुने काही सेंटरही दिसत नाही. रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली अन् सोयी मात्र कमी झाल्या ! मार्चमध्येही जुने सेंटर पुनर्स्थापित केले गेले असते तरी आजची गंभीर स्थिती काही प्रमाणात नक्कीच हातात राहू शकली असती. साहजिकच इस्पितळांवर प्रचंड ताण आला. त्यातून बेड, आँक्सिजन, व्हेंटिलेटर यांच्या कमतरतेची मालिका तयार झाली. त्यात भर पडली रेमडेसिविर नावाच्या इंजेक्शनची ! हे औषध हमखास प्राणरक्षक आहे, या समजातून त्याचा इतका वापर झाला की, काळाबाजार अन् त्यातून तुटवडा असे चक्र फिरले. त्यापायी राजकीय महाभारतही घडले !
मुळात रेमडेसिविर सरसकट सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना उपयोगी नाही, असे अनेक तज्द्न्यांचे मत आहे. कोरोनाग्रस्ततेच्या पहिल्या टप्प्यात त्याचे पाच डोज अनेकांना फायदेशीर ठरले. पण नंतरच्या टप्प्यात त्यापायी रक्तात गुठळ्या होऊन ह्रदय कमजोर होण्याचा धोका असतो. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात किंवा दुरुस्त झाल्यावर ह्रुदयविकाराने का दगावतात, त्याचे हे कारण असल्याचे सांगितले जाते. हू म्हणजे वर्ल्ड हेल्थ आँर्गनायझेशन या जगातील सर्वोच्च आरोग्य संस्थेने तर कोरोनावरील संभाव्य औषधांच्या यादीतूनच रेमडेसिविरला काढून टाकले आहे. उत्तर भारतातील एका डाँक्टरने डेक्सामेथँसोन हे अतिशय स्वस्त औषध पर्याय म्हणून वापरले. तरीही आपल्याकडे रेमडेसिविरपायी राजकारण रंगलेच !
या इंजेक्शनच्या तुटवड्याचा ठपका महाराष्ट्र सरकारने केन्द्रावर ठेवला. तेव्हा काही भाजपा नेत्यांनी दीव-दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीशी संपर्क साधून पन्नास हजार डोज मिळवण्याचा प्रयत्न केला. या कंपनीला फक्त निर्यातीचीच परवानगी होती. तिला रेमडेसिविर इंजेक्शन फक्त महाराष्ट्रात विकण्याची परवानगी मिळवून देण्यात आली. याला महाराष्ट्र सरकारच्या अन्न-औषधी प्रशासनानेही हिरवी झेंडी दाखविली. (पुढे, या “गुस्ताखी”वरून आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली ! हे सत्तारूढ मविआचे राजकारण आहे.) तरीही मुंबई पोलिसांनी फार्माच्या मालकाला ठाण्यात नेऊन साठेबाजीच्या आरोपाची चौकशी केली. भाजपाने यावर आक्षेप घेतला. स्वत: मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनीही खुलासा केला की, भाजपा हे इंजेक्शन सरकारलाच देणार होते. यानंतरही वाद शमला नाही. रेमडेसिविरचा कथित साठाही सरकारला जप्त करता आला नाही. त्याबद्दल ते काही बोलतही नाहीत. त्यामुळेच हे प्रकरण संशयास्पद आणि राजकीय बनले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यात सर्वाधिक रस घेताना का दिसतात, हाही प्रश्न आहेच.
एवढे महाभारत घडण्याचे मुख्य कारण म्हणजे रेमडेसिविरच्या काळ्या बाजारातून उद्भवलेला तुटवडा ! चार-पाच हजारांपर्यंत मिळू शकणारे हे इंजेक्शन 45 हजार रुपयांना विकण्यापर्यंत नफेखोरांची मजल गेली आहे. काही डाँक्टर्स, मेडिकल स्टोर्स, हाँस्पिटल्स यांनी हातमिळवणी करून हा प्रकार घडविला आणि तुटवडा निर्माण केला, हे उघडपणे दिसते. आँक्सिजनचेही तेच झाले. आता तर आँक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे म्रुत्यू होत आहेत. देशात आँक्सिजन निर्मिती वाढविण्यासंबंधीची शिफारस संसदेच्या आरोग्य समितीने करूनही त्याकडे किमान सहा महिने दुर्लक्ष झाले, अशी धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनात सप्टेंबरमध्ये माजी मंत्री डॉ. रणजित पाटील (अकोला) यांनी सरकारला आँक्सिजनच्या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दखल घेतली गेली असती तर आजच्याएवढी वाईट स्थिती नक्कीच झाली नसती. एकूणच, सरकार नावाची संस्था अंदाज घेण्यात, नियोजन करण्यात कमी पडली, गाफील राहिली, असे जाणवत आहे. यामुळे म्रुत्युसंख्या वाढली आहे. रुग्ण मरत आहे, नातेवाईक त्रस्त आहेत. कडक निर्बंध, संचारबंदी, लाँकडाऊन वगैरे शब्द आता गुळगुळीत बनले आहेत. उलट त्यातून दुर्दैवाने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र दिनापासून सुरू होणाऱ्या (हा मुहूर्त आता लांबणीवर पडला आहे) 18 वर्षांवरील लस मोहिमेत भविष्यात आणखी काय गोंधळ वाढून ठेवला आहे, तेही सांगता येत नाही.
अशा लहरी, अनियोजित, धरसोड व्रुत्तीने काम करणाऱ्या सरकेल दिमाग लोकांसाठी आमच्या गावखारीत “रेम्याडोक्या” हा शब्द प्रचलित आहे. कोरोनाच्या संबंधात सर्व स्तरावरील लोकांच्या (कर्तेधर्ते ते जनता) व्यवहाराची सूत्रे अशा गोंधळलेल्या रेम्याडोक्यांच्या हातात तर गेलेली नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया कोरोना महामारीचे भुक्तभोगी नागरिक व्यक्त करताना दिसतात. ही चांगली गोष्ट निश्चितच नाही. उलट, भयावह आहे ! तिचे गांभीर्य सर्वांनी वेळीच लक्षात घेऊन त्वरेने उपाय करण्याची गरज आहे.

विनोद देशमुख

9850587622

Leave a Reply