काल ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली

गडचिरोली : २९ एप्रिल – काल सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. विनय लालू नरोटे (रा. झारेवाडा ता. एटापल्ली) असे एकाचे नाव आहे तर विवेक उर्फ सूरज उर्फ कानू नरोटे (रा. झाडाटोला ता. धानोरा ) असे दुसऱ्या नक्षलवाद्याचे नाव आहे. विनय नरोटे हा गट्टा एलओएसमध्ये सदस्य होता. त्याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे विविध १६ गुन्हे दाखल होते तर विवेक नरोटे याच्यावरही खून, जाळपोळ आणि चकमक असे विविध १८ गुन्हे दाखल होते. विनय नरोटे याच्यावर शासनाने २ लाख तर विवेक नरोटे याच्यावर तब्बल ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा पोलीस मदत केंद्र हद्दीतील जंगल परिसरात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते काही घातपात करण्याची शक्यता असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात गट्टा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले. या मोहिमेदरम्यान आज सकाळी साडेसहा ते सात वाजताच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना दिशेने गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीनंतर काही नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. दरम्यान, जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोधमोहीम राबविली असता दोन जहाल नक्षलवादी मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दोन नक्षलवाद्यांचा विविध गुन्ह्यांत सहभाग होता. गेल्यावर्षी कोठी येथे दुष्यंत नंदेश्वर हा जवान शहीद झाला होता. त्यांच्यावरील हल्ल्यात विवेक नरोटे याचा सहभाग होता. कोठी येथील विनोद मडावी याची पोलीस खबरी असल्याचा संशयावरून झालेली हत्या, पुरसलगोंदी येथील अशोक कुरसामी व बुर्गी येथील उपसरपंच रामा तलांडी यांच्या हत्येतही या दोघांचा सहभाग होता. २१ एप्रिल रोजी गट्टा येथील पोलीस मदत केंद्रावर झालेल्या गोळीबारामागेही या दोघांचा हात होता, अशी माहितीही गोयल यांनी दिली. चकमकीनंतर शोधमोहिमेदरम्यान घटनास्थळावरून एक ९ एमएम पिस्टल व स्फोटक साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या धाडसी कामगिरीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले आहे. नक्षलवाद्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत.

Leave a Reply