८५ वर्षीय कोरोना रुग्णाने दुसऱ्याला देऊ केले ऑक्सिजन बेड, या रुग्णाचा दोन दिवसात मृत्यू

नागपूर : २८ एप्रिल – तरुण कोरोनाग्रस्ताला बेड मिळावा, यासाठी नागपुरातील ८५ वर्षीय वृद्धाने आपला बेड सोडला. आयुष्याचा उपभोग घेऊन झाला, तरुणाचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे, असं म्हणत नारायण भाऊराव दाभाडकर यांनी रुग्णालयातील बेड सोडला. मात्र दोनच दिवसात दाभाडकरांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपुरात राहणाऱ्या ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ६० पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने तिला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. बऱ्याच वेळानंतर त्यांना बेड मिळाला. त्याचवेळी एक महिला आपल्या ४० वर्षीय पतीला वाचवण्यासाठी बेड शोधत असल्याचं त्यांना समजलं. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांना पाझर फुटला.
“मी ८५ वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे” अशा भावना दाभाडकरांनी व्यक्त केल्या. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. दाभाडकर घरी परतले, मात्र तीनच दिवसात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply