तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनदेखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : २८ एप्रिल – या क्षणी भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत दररोज कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आता अनेक सेलिब्रिटीही या प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली
अभिनेता अल्लूने हा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, ‘सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील आपापली चाचणी करून घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका कारण मी ठीक आहे. ‘
अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. यानंतर तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचा टीझरही रिलीज केला होता, जो त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता
सुपरस्टार अल्लू अर्जुनने ही माहिती देताच त्याचे चाहते खूप काळजीत पडले आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्याला लवकर बरे वाटावे म्हणून त्याचे इंडस्ट्रीमधले मित्र-मंडळी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.

Leave a Reply