संपादकीय संवाद – कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व काळजी घेणेच हितावह..

विदर्भातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे आज नागपुरात निधन झाल्याची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनाने वैदर्भीय राजकीय वर्तुळात फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे हे निश्चित. पंचनामा परिवारातर्फे संजयजी देवतळे यांना विनम्र श्रद्धांजली…

सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. रोज लाखो लोक कोरोना रुग्ण म्हणून रुग्णालयात भरती होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना रुग्णालयात जागा मिळत नाही. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण मरत आहेत. त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते आहे.

अर्थात हे लाखो रुग्ण जनसामान्य आहेत. त्यांच्याजवळ उपचारासाठी पैसा नाही. पैसा फेकूनही त्यांना सोयीसुविधा मिळत नाही. त्यांना रुग्णालयात जागा मिळावी म्हणून वशिला लावायला कोणीही नाही. त्यामुळे त्यांचे जगणे आणि मरणे हे पूर्णतः नियतीच्या हातातील खेळणे बनले आहे हे वास्तव नाकारता येत नाही..

मात्र अशी परिस्थिती उच्चपदस्थ व्यक्तिंच्या बाबतीत नाही. त्यांना आजही सर्व सेवासुविधा उपलब्ध होऊ शकतात. तरीही त्यांना मृत्यू गाठतोच आहे. तिथे तुमचे माजी मंत्री, आमदार असणे, तुमची प्रतिष्ठा, तुमचा पैसा काहीही उपयोगात येत नाही. तुम्ही नियतीच्या हातातील खेळणे बनले आहात असेच चित्र निर्माण होते आहे.कोरोनासमोर राव आणि रंक सारखेच आहेत हे स्पष्ट होते आहे…

म्हणूनच आपणा सर्वांना पंचनामा विनम्र आवाहन करित आहे. कोरोना ही आपत्ती आहे. आपण आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत पुढे जातो. पण काही वेळा संकटांसमोर झुकणेच उचित ठरते. महापूरे वृक्ष जाती तेथे लव्हाळे राहती हे तत्व अवलंबणे हाच शहाणपणा ठरतो.

आज कोरोनाच्या संकटासमोर झुकणे हाच शहाणपणा ठरणार आहे. आम्हाला काही होत नाही अशी मुजोरी करत बेबंद वागणे हे आपल्यासाठी मृत्यूला जवळ बोलावणारे ठरणार आहे याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी सर्व काळजी घ्यावी, स्वतःलाही जपावे आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे कळकळीचे आवाहन पंचनामा आज या निमित्ताने आपणा सर्वांना करत आहे…

अविनाश पाठक..

Leave a Reply