छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केले प्रवासी रेल्वेला लक्ष, एक तास रेल्वेत घातला गोंधळ

रायपूर : २४ एप्रिल – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आता प्रवासी रेल्वेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे रुळांवर सिमेंट ब्लॉक, दगड टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. दंतेवाडा ते बचेली दरम्यान नेरली पुलाजवळ रेल्वे रुळाला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
विशाखापट्टणमहून किरंदूलकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचा यामुळे मोठा अपघात झाला असता. मात्र, लोको पायलटने योग्य वेळी ब्रेक लावले. ज्यामुळे अपघात झाला नाही आणि सुदैवाने मोठा अपघात टळला. यानंतर सशस्त्र नक्षलवाद्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश करत उपस्थित प्रवाशांच्या हातात पोस्टरं दिली. येत्या 26 एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन पत्रकांमधून करण्यात आले आहे.
जवळपास एक तास घनदाट जंगलात रेल्वेमध्ये गोंधळ घालून नंतर नक्षलवादी निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना त्यंच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले. या जागेवर पूर्वीही अनेकदा नक्षलवाद्यांनी मालवाहतूक रेल्वे रुळावरून घसरवली आहे. मात्र, पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी प्रवासी रेल्वेला या मार्गावरून उतरवण्याचा प्रयत्न करत लक्ष्य केले आहे.

Leave a Reply