छत्तीसगढमध्ये अपहृत पोलीस उपनिरीक्षकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

रायपूर : २४ एप्रिल – एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (3 एप्रिल) छत्तीसगडमधील बीजापूर याठिकाणी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात 22 भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता माओवाद्यांनी आणखी एका जवानाची हत्या केली आहे. तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केली आहे. यामुळे परिसरात माओवादी आणि भारतीय जवानांत तणाव वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित पोलीस उपनिरीक्षकाचं नाव मुरली ताती असून बिजापुर जिल्ह्यातील पालनार येथून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 21 एप्रिल रोजी अपहरण केल्यानंतर तीन दिवसांनी माओवाद्यांनी त्यांची हत्या केली आहे. यानंतर माओवाद्यांनी त्यांचा मृतदेह गंगलूरच्या रस्त्यावर टाकला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. तत्पूर्वी उपनिरीक्षकाच्या कुटूंबीयांनी मीडियाच्या माध्यमातून सुटका करण्याची मागणी केली होती. मात्र माओवाद्यांनी जन अदालतमध्ये त्यांची हत्या घडवून आणली आहे. याबाबतचं एक पत्रही माओवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागीय समितीनं जारी केलं आहे.
मागील काही काळापासून छत्तीसगड राज्यात नक्षलवादी हल्ले वाढले आहेत. यामुळे भारतीय जवानांचा नाहक बळी जात आहे. माओवाद्यांनी तीन दिवसांपूर्वीही छत्तीसगडमधील एका पोलीस ठाण्यावर जबरी हल्ला केला आहे. यावेळी माओवाद्यांनी जांबिया पोलीस ठाण्यावर गोळीबारासोबतच ग्रेनेडचा माराही केला आहे. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याला पोलिसांनीही गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यावेळी मोठा हत्याकांड घडवण्याचा मानस माओवाद्यांचा होता.

Leave a Reply