विद्यापीठांच्या उर्वरित परीक्षा ऑनलाईन, विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना मिळणार कोरोनाची लस

मुंबई : २२ एप्रिल – कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तेरा विद्यापीठांच्या सर्व उर्वरित परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुलगुरूंबरोबरच्या बैठकीत यावर निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कोरोनाच्या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठांमार्फत लस देता यावी यासाठी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सामंत म्हणाले.
राज्यात काही विद्यापीठांच्या ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन परीक्षा सुरू होत्या. मात्र आता उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईनच होणार असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑनलाईन परीक्षेसाठी यंत्रणा उभारणार असून, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना प्रमाणपत्रं मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांच्या भवितव्यातील शिक्षणात अडचणी येणार नाही, त्याला प्राधान्य असेल असंही सामंत यांनी म्हटलं आहे.
उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत गणले जावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच विधी विभागाच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झाली असून ती होणारच आहे, मात्र कोविडचं संकट कमी झाल्यानंतर नवी प्राध्यापक भरती होईल, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणाले.
राज्यातील 37 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा मनोदय यावेळी उदय सामंत यांनी बोलून दाखवला. 18 ते 25 वयोगटातील या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी विद्यापीठांच्या मार्फत यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले. तसं झाल्यास लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळणं शक्य होईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना लस मोफत देण्याबाबतचा निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेऊ शकतील असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply