राज्य सरकारने केंद्रावर टीका करण्यापेक्षा केंद्राचे सहकार्य मिळवून घ्यावे – नवनीत राणा

अमरावती : २१ एप्रिल – राज्य सरकारने केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी त्यांचे सहकार्य मिळवून घ्यावे असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकार राज्याला सर्व ती मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने या कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, पीपीई किट, व्हेंटिलेटर, औषधे व इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून महाराष्ट्राला योग्य ती साथ देत आहे. मात्र या संकट समयी नागरिकांचे प्राण वाचविणे महत्वाचे असून महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका टिप्पणी न करता त्यांच्याकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळवून घ्यावे. ही वेळ राजकारण करण्याची नव्हे तर माणसे जगविण्याची आहे असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
या कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, आरोग्य यंत्रणा, मनपा प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचे कोरोना योद्धा म्हणून मोलाचे सहकार्य मिळत आहे. आता नागरिकांनीही स्वयंशिस्त बाळगून स्वतःची काळजी घ्यावी व घरातच सुरक्षित राहावे जेणेकरून कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल. यामुळे आपण सर्व या महामारीतून लवकरच मुक्त होवू अशी विनंतीही राणा यांनी केली आहे. या कोरोना महामारीतून आपला सर्वांची मुक्तता व्हावी अशी प्रार्थनाही नवनीत राणा यांनी केली. तसेच या महामारीत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी खासदार म्हणून आपण सतत केंद्राकडे पाठपुरावा करीत असून यापुढेही केंद्राकडून काहीही कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राणा यांनी दिली आहे.

Leave a Reply