देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी


नवी दिल्ली : १८ एप्रिल – देशातील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात सुमारे पावणेतीन लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद देशात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी सध्या निवडणुकीसाठीच्या प्रचारयात्रांवर बंदी आणण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे.
“देशातील कोरोना रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. मोदीजी – देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करा; निवडणूक आयोग – देशातील प्रचारयात्रांवर बंदी घाला; न्यायालये – लोकांच्या जिवीताचे रक्षण करा” अशा आशयाचे ट्विट सिब्बल यांनी केले आहे.
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर केंद्र सरकार देशाला भयानक संकटात ढकलत नेत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. भाजपा सरकारच्या बिनडोकपणाची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागत असल्याचेही पी. चिदंबरम यांनी म्हटले.

Leave a Reply